आदानी, अंबानींच्या उत्पादनावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:40+5:302020-12-30T04:30:40+5:30
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून त्यांचे कंबरडे मोडले आहे. या कायद्यांची झळ ...

आदानी, अंबानींच्या उत्पादनावर बहिष्कार
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून त्यांचे कंबरडे मोडले आहे. या कायद्यांची झळ केवळ शेतकरी व कामगारांना बसणार नाहीतर सामान्य माणूसही त्यात भरडला जाणार आहे. या कायद्यामागे असणारे अंबानी व आदानी यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे.
‘आयटक’चे दिलीप पवार म्हणाले, सर्वसामान्य माणसाने आता बघ्याची भूमिका न घेता कायद्यांना कडाडून विरोध केला पाहिजे. बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी उद्योगपतींना हवे तसे निर्णय घेत आहेत. हे खपवून घेता कामा नये, यासाठी शुक्रवारी (दि. १) पासून राज्यभर आदानी व अंबानीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. यामध्ये सामान्य माणसाने सहभागी होऊन आपली ताकद दाखवून द्यावी.
श्रमिकचे अतुल दिघे म्हणाले, देशातील अन्नधान्य ताब्यात घेऊन ते आफ्रिका, आशिया खंडात विक्री करण्याचा घाट आदानी व अंबानींचा आहे. जग मुठीत ठेवण्याचा प्रयत्न उद्योगपतींचा असून त्यांनाच मुठीत ठेवण्यासाठी या कायद्यांना विरोध केला पाहिजे.
सिटूचे जिल्हा सचिव प्रा. सुभाष जाधव म्हणाले, पहिल्या टप्प्यात या उद्योगपतींची उत्पादनांवर बहिष्कार घालायची आहेत. देशाच्या मालकीच्या कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. राजेश वरक, एस. बी. पाटील, सदाशिव निकम, श्रीराम भिसे, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.