सॅनिटायझरची बाटली काशीद कुटूंबासाठी ठरली कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:25+5:302021-01-08T05:21:25+5:30
बोरवडे : सॅनिटायझर हे कोरोनाच्या संकटात जरी जीवदान देणारं ठरले असलं, तरी ते जीव घेणारं देखील आहे. त्यामुळं त्याला ...

सॅनिटायझरची बाटली काशीद कुटूंबासाठी ठरली कर्दनकाळ
बोरवडे : सॅनिटायझर हे कोरोनाच्या संकटात जरी जीवदान देणारं ठरले असलं, तरी ते जीव घेणारं देखील आहे. त्यामुळं त्याला काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे. कागल तालुक्यातील बोरवडे येथे सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेला जीव गमवावा लागला. आगीत पडलेली ती सॅनिटायझरची बाटली सुनीता काशीद व त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कर्दनकाळ ठरली.
बोरवडेपैकी दत्तनगर येथे मागील रविवारी सायंकाळी सुनीता काशीद घरातील केरकचरा पेटवत होत्या. कचऱ्याबरोबर घरातील सॅनिटायझरची बाटली देखील त्यामध्ये आली आणि कचरा पेटवताच सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की सुनीता यामध्ये ऐंशी टक्के भाजल्या. शेजाऱ्यांनी आग विझवून सुनीता यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, पाच ते सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुनीता यांचा अखेर मृत्यू झाला.
सॅनिटायझरमध्ये ८० टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. त्यामुळं त्याचा आगीशी संपर्क आला की ते लगेच पेट घेते. सॅनिटायझरच्या बाटल्या आता वेगवेगळ्या प्रकारात आल्या आहेत. मात्र, त्याची हाताळणी काळजीपूर्वक केली गेली पाहिजे. अन्यथा कोरोना विरोधात शस्त्र म्हणून वापरले गेलेले सॅनिटायझर चुकीच्या वापरामुळे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने जिवावर बेतू शकते, हे सुनीता काशीद यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे दिसून आले आहे.