दोन्ही ‘संजय’ कागलात एकत्रितच लढणार
By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:53:45+5:302015-11-27T01:04:24+5:30
मंडलिक-संजय घाटगेंचा निर्णय : विधान परिषदेचा फैसला ९ डिसेंबरला

दोन्ही ‘संजय’ कागलात एकत्रितच लढणार
कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकारणात सर्व निवडणुका मंडलिक-संजय घाटगे गट म्हणूनच एकत्रित लढविण्याचा निर्णय कागल तालुक्यातील प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे गटाच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषद निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे नऊ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या दोन्ही गटाला मानणारी तालुक्यात चौदा मते असून त्यांना या निवडणुकीत चांगलेच महत्त्व आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत नऊ डिसेंबरपर्यंत आहे. तोपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे त्यादिवशी पाठिंबाचा निर्णय घेण्याचे ठरले.
व्हनाळी (ता. कागल) येथे घाटगे यांच्या घरी बुधवारी दोन्ही गटांच्या नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य, सभापती व प्रमुख कार्यकर्त्यांना घाटगे यांनी स्नेहभोजन ठेवले होते. कागलच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मंडलिक-संजय घाटगे एकत्र आहेत; परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना सत्तारुढ पॅनेलमध्ये घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील भविष्यातील राजकारणात मंडलिक कुणाबरोबर राहणार, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू होती. त्याचाही खुलासा या बैठकीत झाला. भविष्यातील सर्व निवडणुका आपण एकत्रित गट म्हणूनच लढविणार असल्याचे प्रा. मंडलिक यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्णाच्या राजकारणात मंडलिक गट खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आहे. कारण लोकसभेला संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढतच झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेला ते आमदार महादेवराव महाडिक यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही. संजय घाटगे यांचा मुलगा ‘गोकुळ’मध्ये संचालक असला तरी तो माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पॅनेलमध्ये घेतल्याने निवडून आला आहे. त्यामुळे हे दोघेही काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाल्यास जरी ते शिवसेनेचे असले तरी सतेज पाटील यांच्याच मागे राहण्याची शक्यता गडद आहे. मंडलिक यांच्यासोबत राजेखान जमादारही काम करतात. त्यांना मानणारी तीन मते मुरगूड नगरपालिकेत आहेत. त्यांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही. कागल तालुक्यात आमदार मुश्रीफ यांना मानणारी कागल नगरपालिकेत दहा मते आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेसचा जो कुणी उमेदवार असेल त्यास ती मते मिळतील. मुरगूड नगरपालिकेत रणजित पाटील यांची नऊ मते आहेत. ‘गोकुळ’च्या सत्तेत आमदार महाडिक यांच्यामुळे ते अनेक वर्षे आहेत. त्यामुळे रणजित पाटील यांचा गट महाडिक यांच्या पाठीशी राहणार हे स्पष्टच आहे.
संजय घाटगेंच्या उमेदवारीबाबत चर्चा
या बैठकीनंतर गुरुवारी दिवसभर कागल तालुक्यात वेगळीच चर्चा सुरू राहिली. संजय घाटगे हेच विधानपरिषदेला अपक्ष म्हणून लढणार असून, त्यासाठीच ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत होते. आमदार महाडिक हे स्वत: निवडणूक न लढविता संजय घाटगे यांना पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व घाटगे यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नाराज लोक व शिवसेना-भाजपची मदत घेऊन त्यांनी मैदानात उतरावे, असा चर्चेचा सूर होता असे सांगण्यात येत होते; परंतु अधिक चौकशी केली असता त्यात फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.