कबनुरात बनावट बांधकाम परवान्यावर कारवाई न केल्याने दोघांचे आमरण उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:52+5:302021-09-08T04:31:52+5:30
कबनूर : येथील गट क्रमांक १०२८ मधील इरगोंडा म्हादगोंडा पाटील यांच्या नावाने दिलेल्या बनावट बांधकाम परवान्यावर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई ...

कबनुरात बनावट बांधकाम परवान्यावर कारवाई न केल्याने दोघांचे आमरण उपोषण सुरू
कबनूर : येथील गट क्रमांक १०२८ मधील इरगोंडा म्हादगोंडा पाटील यांच्या नावाने दिलेल्या बनावट बांधकाम परवान्यावर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते शांतिनाथ कामत व अजित खुडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
बनावट बांधकाम परवान्याबाबत गटविकास अधिकाºयांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी कबनूर ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत नसल्याने मंगळवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शांतीनाथ कामत व अजित खुडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे दिला होता. तथापि कायदेशीर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ मुख्य चौकातील कट्ट्यावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. सरपंच शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुंभार यांनी बनावट बांधकाम परवाना रद्द केल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दाखवले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, उपोषणकर्त्यांनी बनावट बांधकाम परवानासंदर्भात कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. उपोषणकर्त्यांना विहिंपचे बाळ महाराज, ग्रा. पं. सदस्य मधुकर मणेरे, वैशाली कदम, माजी उपसरपंच नीलेश पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख रवींद्र धनगर, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत जगताप, प्रा. अशोक कांबळे, मेहबूब मुल्ला, महावीर लिगडे, दत्तात्रय पाटील, रघुनाथ हळवणकर, सागर कोले, दत्ता शिंदे, उत्तम जाधव आदींनी भेटून पाठिंबा दर्शविला.
फोटो ओळी
०७०९२०२१-आयसीएच-०७
कबनूर (ता. हातकणंगले) येथे बनावट बांधकाम परवान्यावर कायदेशीर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते शांतिनाथ कामत व अजित खुडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.