नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दोघींचे अर्ज
By Admin | Updated: July 2, 2015 00:44 IST2015-07-02T00:42:03+5:302015-07-02T00:44:37+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : विरोधी आघाडीतर्फे राजेश बोरगावे यांचा अर्ज दाखल

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दोघींचे अर्ज
गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दोन अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदाच्या दावेदार ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे व सरिता गुरव या दोघींचेही अर्ज राष्ट्रवादीतर्फे दाखल झाले. विरोधी आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीतर्फे शिंदे व गुरव यापैकी कुणाला संधी मिळणार, हे माघारी दिवशी शुक्रवारी (दि. ४) स्पष्ट होईल.
पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल - जनसुराज्य - काँगे्रस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमतामुळे गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीने यावेळीही इच्छुक दोघींचेही अर्ज दाखल केले.
सकाळी ‘राष्ट्रवादी’चे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येकाचे वैयक्तिक मत जाणून घेतले. तब्बल दोन तासांच्या चर्चेअंती दोघींचे अर्ज भरण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा कावेरी चौगुले, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, युवा शहराध्यक्ष सुनील गुरव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, सतीश पाटील, राहुल पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब घुगरे, आदींसह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘गडहिंग्लज’कर अपवाद !
कोल्हापूरचा महापौर, कागल-मुरगूड व पन्हाळ्याचा नगराध्यक्ष निवडताना आमदार मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्याठिकाणच्या निवडीदेखील एकमतानेच होतात. मात्र, ‘गडहिंग्लज’ याला अपवाद राहिले आहे. येथील निवडीत स्वत: लक्ष घातले, तरी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांत ‘एकमत’ घडविण्यासाठी खूप कष्ट पडतात. याचा अनुभव त्यांना आज पुन्हा एकदा आला.
यावेळी दोन..
गतवर्षी मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांच्यासह शिंदे व गुरव यांनीही दावा केला होता. त्यामुळे तिघींंचेही अर्ज भरले होते. यावेळीदेखील शिंदे व गुरव यांच्यात एकमत न झाल्यामुळेच दोघींचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विरोधकांच्या खेळीवरच निर्णय घेतला जाणार आहे.