अटीतटीच्या दोन्ही सामन्यांत ‘बरोबरी’च
By Admin | Updated: December 9, 2014 00:57 IST2014-12-09T00:50:45+5:302014-12-09T00:57:15+5:30
केएसए लीग फुटबॉल : खंडोबा विरुद्ध फुलेवाडी; दिलबहार ब विरुद्ध पॅट्रीयट सामने टाय

अटीतटीच्या दोन्ही सामन्यांत ‘बरोबरी’च
कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, सोमवारी तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यातील सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली; तर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध पॅट्रीयट स्पोर्टस् या दोघांमधीलही सामना
१-१ असा बरोबरीतच राहिला. दोन्ही सामने शेवटच्या काही क्षणात अटीतटीचे झाले.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रात पहिला सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रिडा मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘फुलेवाडी’कडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्यास तितक्याच जोरदारपणे प्रतिकार करीत प्रतिआक्रमण केले. ६ व्या मिनिटाला ‘फुलेवाडी’च्या तेजस जाधवने सूरज शिंगटेच्या पासवर गोलची नोंद करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘खंडोबा’कडून श्रीधर परब, चंद्रशेखर डोका, सचिन बारामती यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत फुलेवाडीच्या गोलक्षेत्रात पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, फुलेवाडीचा गोलरक्षक निखील खाडेने उत्कृष्ट गोलरक्षण करीत ते अडवले. ४० व्या मिनिटास मिळालेल्या कॉर्नर किकवर खंडोबाच्या श्रीधर परबने अचूक गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला.
उत्तरार्धात खंडोबाकडून विकी सुतार, सागर पोवार, शशांक, अर्जुन शेतगावकर यांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. शेवटच्या काही मिनिटात दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. फुलेवाडीकडून अजित पोवार, अरुणोशु गुप्ता, तेजस जाधव, मंगेश दिवसे, रौफ खान, दिग्विजय वाडेकर यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
दुसरा सामना दिलबहार ‘ब’ विरुद्ध पॅट्रीयट स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी कंटाळवाण्या खेळाचे प्रदर्शन केले. दिलबहार ‘ब’ कडून आदित्य माने, शुभम सरनाईक, सुशिल माने, शुभम माळी, महमद मोईन यांनी ‘पॅट्रीयट’च्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. मात्र, पॅट्रीयटच्या सजग बचावफळीने त्या निष्प्रभ ठरवल्या.
१९ व्या मिनिटास दिलबहार‘ब’ च्या महमद मोईनने गोलरक्षकाला चकवत गोलची नोंद केली. या गोलमुळे दिलबहार ‘ब’ने सामन्यात
१-० अशी आघाडी मिळवली. पॅट्रीयटकडून राहुल देसाई, रजत शेट्टी, सय्यद नईमुद्दीन यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ६० व्या मिनिटास पॅट्रीयटच्या आदित्य साळोखेने मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केले. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक मारली. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत आघाडी घेता न आल्याने सामना १-१ असा बरोबरीत राहीला. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ या दोन संघांच्या लढतीमधील एक चुरशीचा क्षण.