दानोळीतील दोघे ताब्यात
By Admin | Updated: September 3, 2014 00:24 IST2014-09-03T00:24:01+5:302014-09-03T00:24:01+5:30
चाकूहल्ला प्रकरण: एकजणाची बालसुधारगृहात रवानगी

दानोळीतील दोघे ताब्यात
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथे किरकोळ कारणातून झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना आज, मंगळवारी ताब्यात घेण्यात आले असून, एकजण अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे; तर अभिजित अशोक राऊत (वय १९) या संशयित आरोपीला उद्या, बुधवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
जखमी विजय ऊर्फ दीपक बापू मोरडे-गावडे (२०, रा. धनगर गल्ली) याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दानोळी येथे शनिवारी (दि. ३०) डोळ्यावर कापड बांधून काठीने मडके फोडण्याची स्पर्धा होती. यावेळी जखमी विजय मोरडे व अल्पवयीन संशयित आरोपी यांच्यात वाद झाला होता. काल, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हनुमान चौकाकडून विजय मोरडे हा चालत येत असताना राऊतने विजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी अल्पवयीन तरुणाने चाकूने विजयच्या छातीवर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला.
मोरडे याच्या फिर्यादीवरून आज संशयित अल्पवयीन तरुणाला सकाळी साडेदहाच्या सुमारास अंकली येथे, तर राऊत याला दुपारी दानोळी येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)