‘राजर्षी शाहू’ नावानेच दोन्ही आघाड्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:34+5:302021-04-18T04:23:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ व विरोधी गट आमनेसामने आला आहे. विरोधी आघाडीने साधारणत: तीन आठवड्यांपूर्वी ...

‘राजर्षी शाहू’ नावानेच दोन्ही आघाड्या रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ व विरोधी गट आमनेसामने आला आहे. विरोधी आघाडीने साधारणत: तीन आठवड्यांपूर्वी ‘राजर्षी शाहू आघाडी’ असे पॅनलचे नाव जाहीर केले. मात्र, सत्तारूढ गटानेही ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाने प्रचार सुरू केल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
ग्रामपंचायत असो अथवा सहकारी संस्थांच्या निवडणुका यात पॅनलच्या नावाला खूप महत्त्व असते. स्थानिक पातळीवर ग्रामदैवतांच्या नावाने पॅनल तयार केली जातात, तर जिल्हा पातळीवरील संस्थांमध्ये सत्तारूढ आघाडी व विरोधी परिवर्तन आघाडी, अशी साधारणपणे नावे असतात. त्यातील एकाचे ‘राजर्षी शाहू’चे नाव असतेच. त्यावेळी दुसरे पॅनल वेगळ्या नावाने उभे राहते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मात्र दोन्ही आघाड्यांनी ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाने पॅनल उभे केले आहेत.
विरोधी आघाडीने साधारणपणे तीन आठवड्यांपूर्वी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाची घोषणा करून त्यानुसार प्रचार यंत्रणा सक्रिय केली. त्यामुळे सत्तारूढ गट कोणत्या नावाने सभासदांसमोर जाणार याविषयी उत्सुकता होती. शनिवारी सत्तारूढ गटाकडून राजर्षी शाहू आघाडीच्या नावाने प्रचार सुरू केल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
सत्तारूढ गटाचा एकत्रित प्रचार
सत्तारूढ गटाच्या उमेदवारांनी ‘राजर्षी शाहू’ आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचार यंत्रणा एकत्रित सक्रिय केली. आमदार पी.एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी.डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अमरीश घाटगे, सत्यजित पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, अनुराधा पाटील, शौमिका महाडिक हे प्रचारात सक्रिय आहेत.