कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी !

By Admin | Updated: August 28, 2014 00:23 IST2014-08-28T00:19:55+5:302014-08-28T00:23:36+5:30

१५०-१३८ फॉर्म्युला निश्चित : ‘उत्तर’ , ‘शिरोळ’वर राष्ट्रवादीचा दावा

Both Congress Fifty-Fifty in Kolhapur district! | कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी !

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी !

राजाराम लोंढे - कोल्हापूर --काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित असून, राष्ट्रवादी काँग्रेसला १३८ जागा देण्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाढीव जागांमध्ये कोल्हापूर जिल्ह्णात दोन जागा काँग्रेसने सोडाव्यात, असा प्रस्तावही राष्ट्रवादीकडून पुढे केला आहे. दहापैकी चंदगड, कागल, राधानगरीसह कोल्हापूर उत्तर व शिरोळ मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने गेले दोन महिने स्वबळाची भाषा करत जागा कमी-जास्त करण्याबाबत ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे आघाडी होणार की स्वबळावर लढावे लागणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा निकष लावत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दहा जागा कमी केल्या होत्या. हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादीने सुरुवातीपासून निम्या जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यावर दोन्ही काँग्रेसमध्ये अनेकवेळा बैठका होऊन १३८ जागांवर एकमत झाले आहे. वाढीव जागांमध्ये जिल्ह्णातील कोल्हापूर उत्तर, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी मतदारसंघांची अदला-बदल होऊ शकते. ‘उत्तर’मधून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी आपल्या उमेदवारीबाबत संकेत न दिल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. शेवटच्या क्षणी हा मतदारसंघच सोडला जाऊ शकतो. शिरोळमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा काँग्रेस सहजासहजी सोडण्याची शक्यता कमी आहे पण येथून ज्येष्ठ नेते आमदार सा. रे. पाटील पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता फारच धूसर आहे, त्यातच राष्ट्रवादीकडे येथून ताकदीचा उमेदवार असल्याने हा मतदारसंघ द्यावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू झाला आहे. शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हे राष्ट्रवादीचे मित्र आहेत. त्यांच्याविरोधात थेट शड्डू ठोकणे राष्ट्रवादीला जिल्ह्णातील पुढील निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते. हातकणंगलेमधून काँग्रेसतर्फे माजी मंत्री जयवंतराव आवळे लढणार आहेत. त्यांनी तयारी सुरू केल्याने हाही मतदारसंघ काँग्रेस सोडणे अशक्य आहे. राष्ट्रवादीच्या वाढीव दोन जागांपैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक जागा मिळावी, तेही हातकणंगले किंवा शिरोळ यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. पण काहीही झाले तरी जिल्ह्णात दोन्ही काँग्रेस फिफ्टी-फिफ्टी जागांवर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Web Title: Both Congress Fifty-Fifty in Kolhapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.