बोरखिंड धरण ओव्हरफ्लो
By Admin | Updated: August 1, 2014 01:07 IST2014-07-31T22:04:00+5:302014-08-01T01:07:04+5:30
बोरखिंड धरण ओव्हरफ्लो

बोरखिंड धरण ओव्हरफ्लो
पांढुर्ली : सिन्नर तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी डोंगररांगेत सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पश्चिम भागात सलग तीन दिवसांपासून
सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार सुुरू असल्याने धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. औंढेवाडी पट्ट्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले.
यावर्षी तब्बल दीड महिना पावसाळा लांबल्यामुळे बोरखिंड धरणाने तळ गाठला होता. या धरणातून पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी धरणाने तळ गाठल्याने सदर योजना संकटात सापडली होती. जुलै महिन्यात या योजनेचे पाणी कमी झाल्याने दररोज करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ दिवसाआड झाला होता. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शिवडा, बोरखिंड व घोरवड या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
बोरखिंड धरणामुळे बोरखिंडसह पांढुर्ली, शिवडा व आगासखिंड या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी फायदा होतो. या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. यावर्षी पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र औढेवाडी डोंगररांगेत सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण तुडूंब भरून वाहू लागले आहे.
दरम्यान, पांढुर्लीसह घोरवड, शिवडा, विंचूरदळवी, आगासखिंड, बेलू, बोरखिंड या गावांसह सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्याने नदी-नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी
मिळणार आहे. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीकामांना वेग येईल. (वार्ताहर)