सीमा सुरक्षा दलातील जवानास लाखाचा गंडा
By Admin | Updated: July 13, 2015 00:31 IST2015-07-12T23:37:22+5:302015-07-13T00:31:47+5:30
आॅनलाईन फसवणूक : बँक अधिकारी असल्याचे भासवून महिलेचे कृत्य

सीमा सुरक्षा दलातील जवानास लाखाचा गंडा
मिरज : सीमा सुरक्षा दलातील हवालदार अंकुश रामा शिंगाडे (रा. वानलेसवाडी) यांना अज्ञात महिलेने बँक अधिकारी असल्याचे भासवत त्यांचा एटीएम पासवर्ड मिळवून एक लाखाची फसवणूक केली. फसवणुकीबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या शिंगाडे यांना पोलिसांनी पिटाळून लावले. अंकुश शिंगाडे त्रिपुरा सीमेवर सुरक्षा दलात कार्यरत आहेत. सुटीवर गावी आलेल्या अंकुश शिंगाडे यांच्या मोबाईलवर अज्ञात महिलेने फोन करून अंधेरी स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. एटीएम क्रमांकाचे आॅनलाईन नूतनीकरण करावयाचे असल्याचा बहाणा करून महिलेने शिंगाडे यांना एटीएम क्रमांक व पासवर्ड विचारून घेतला.
याआधारे आॅनलाईनवर तब्बल एक लाख चार हजारांची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या साहित्याची १५ हजार, २० हजार व २५ हजार अशी रक्कम खात्यातून कपात होऊन मेसेज मोबाईलवर आल्यामुळे शिंगाडे यांनी याबाबत विचारणा केली. महिलेने ही रक्कम तुमच्या खात्यातून ट्रान्सफर होत असल्याचे सांगितले. आपण फसल्याची जाणीव झाल्याने शिंगाडे यांनी बँकेत धाव घेऊन खाते बंद केले. विश्रामबाग व सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी तीन दिवस प्रयत्न केले. त्यांची भेट होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)
दुसरी मोठी घटना
माधवनगर येथील एका महिलेने काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एटीएमवरील पैसे काढून एकास ११ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.
पोलिसांची टोलवाटोलवी
फसवणुकीनंतर शिंगाडे थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. तिथे पोलिसांनी बँकेची शाखा शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याचे सांगून त्यांना शहर पोलिसांत जाण्यास सांगितले. शहर पोलिसांनी ते वानलेसवाडीत राहात असल्याने तुम्ही विश्रामबाग पोलिसांत तक्रार द्यावी, असा सल्ला दिला. दोन्ही पोलीस ठाण्यांत हेलपाटे मारून शिंगाडे यांनी पोलिसांचा नाद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.