सीमावासीयांनी अनुभवला शून्य सावली दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:30+5:302021-05-07T04:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्यासोबत असते. हीच सावली ...

सीमावासीयांनी अनुभवला शून्य सावली दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्यासोबत असते. हीच सावली बुधवारी, ५ मे रोजी काहीशी गायब झाली. या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला. दुपारी १२.२९ वाजता काही क्षणापुरती आपली सावली दिसेनाशी झाली, यालाच ‘शून्य सावली दिवस’ म्हणतात. कुरली - निपाणी परिसरातील लोकांना याचा अनुभव घेता आला. खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी या परिसरातील स्थिती अनुकूल होती.
सूर्य डोक्यावर येतो किंवा आला, असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे यावर्षीचे दोन दिवस म्हणजे ५ मे आणि ७ ऑगस्ट आहेत. सिद्धेश्वर विद्यालय, कुरली येथील विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी शून्य सावली दिवसाचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. विद्यालयातील सर सी. व्ही. रामन विज्ञान प्रसार नेटवर्क क्लब यांच्यावतीने दरवर्षी शून्य सावली दिवसाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी याचा घरीच अनुभव घेतला.
कुरली परिसरातच सावली का गायब झाली
कुरलीचे अक्षांश १६.७४ अंश उत्तर आहे. सूर्याचा डिक्लीनेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायनामध्ये १६.७४ अंश असतो, तेव्हा कुरलीत सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.२९ वाजता सूर्याचा डिक्लीनेशन पॉईंट १६.७४ अंश असल्याने बुधवारी शून्य सावली अनुभवता आली. विद्यालय परिसरात कोरोना नियमांचे पालन करून शून्य सावली पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बी. एस. पाटील, टी. एम. यादव, एस. एस. साळवी, के. एम. शेवाळे, टी. के. जगदेव, वाय. टी. पाटील, नवनाथ पाटील, संदीप चौगुले, अथर्व गरगोटे, आदर्श डोंगरे, दिग्विजय यादव, रोहन मस्कर, प्रणित डोंगरे उपस्थित होते.
फोटो : वेगवेगळ्या वस्तूंची लंबरुप अवस्थेत पडणारी सावली काचेच्या साह्याने अनुभवण्यात आली.