सीमा आंदोलन; हुतात्म्यांच्या वारसांना न्याय
By Admin | Updated: May 6, 2015 00:19 IST2015-05-06T00:12:46+5:302015-05-06T00:19:10+5:30
निवत्तिवेतनात वाढ : सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; राज्यातील चौदाजणांना लाभ

सीमा आंदोलन; हुतात्म्यांच्या वारसांना न्याय
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य आलेल्या वारसांच्या निवृत्तिवेतनात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. वाढीव वेतनाप्रमाणे आता दरमहा १० हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांसाठी चौदा वारसांसाठी तीन लाख ४३ हजार रुपये संबंधित जिल्हा प्रशासनाकडे शासनाने २७ एप्रिल २०१५ रोजी वितरित केले आहेत. यासंबंधीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रि. इ. शेख यांनी पाठविला आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी १९५६ मध्ये लढा तीव्र झाला होता. त्यानंतर १९५६ मध्ये कन्नडसक्तीच्या विरोधात आंदोलन व्यापक बनले. या दोन्ही आंदोलनांत मृत्यू पावलेल्यांना शासनाने हुतात्मे म्हणून घोषित केले. हुतात्म्यांच्या हयात पत्नी, आई, वडील यांपैकी एकास पहिल्यांदा एक हजार रुपये मासिक वेतन दिले जात होते. सन १९९९ मध्ये ते पंधराशे करण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये दरमहा ते आठ हजार रुपये करण्यात आले. २१ एप्रिल २०१५ रोजी पुन्हा दोन हजारांची वाढ करून दरमहा दहा हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ २ आॅक्टोबर २०१४ पासून दिली जाणार आहे.
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा हे वेतन वितरित केले जाते. वाढीव निवृत्तिवेतनानुसार सन २०१५-१६ सालाची एकूण २० लाख ६३ हजार रक्कम देय आहे. यातील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी ३ लाख ४२ हजार रुपये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाने वितरित केले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील नऊ हुतात्म्यांच्या वारसांना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हे निवृत्तिवेतन वितरित केले जाते. चार वर्षांनंतर शासनाने दोन हजारांची वाढ केल्यामुळे वारसांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शासनाने नियमित वाढीतून दोन हजारांची वाढ हुतात्म्यांच्या वारसांना केली
आहे. मात्र, प्रत्यक्षात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्मे झाले असताना १४ वारसांना निवृत्तिवेतन दिले जाते, ही खेदाची बाब आहे. बेळगाव जिल्ह्यातील नऊ वारसांना निवृत्तिवेतन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून दिले जाते. आणखी पाच हुतात्म्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- मालोजी अष्टेकर, नेते, महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव)