बुथ पडले अपुरे, मतदारांच्या वाढल्या रांगा

By Admin | Updated: July 13, 2015 00:45 IST2015-07-13T00:43:46+5:302015-07-13T00:45:18+5:30

बाजार समितीची निवडणूक : विकास संस्था गटातील उमेदवार संख्येमुळे मतदारांची दमछाक; ६२ केंद्रांवर मतदान

Booth fell incomplete, increased ranks of voters | बुथ पडले अपुरे, मतदारांच्या वाढल्या रांगा

बुथ पडले अपुरे, मतदारांच्या वाढल्या रांगा

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी झालेल्या मतदानात केंद्रातील बुथची संख्या कमी असल्याने प्रत्येक केंद्र्रावर शेवटपर्यंत मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. विकास सेवा संस्था गटातील सर्वसाधारण सात जागांसाठी तब्बल ४३ उमेदवार रिंगणात होते. त्यातून शोधून शिक्के मारताना मतदारांची दमछाक झाली. परिणामी मतदानास वेळ लागत होता.
बाजार समितीसाठी करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा कार्यक्षेत्रातील ६२ केंद्रांवर मतदान झाले. अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार व पणन प्रक्रिया संस्था गटाचे निम्मे मतदान कोल्हापूर येथील सात केंद्रांवर झाले. या गटातील मतदारसंख्या मर्यादित असल्याने येथे फारशी गर्दी झाली नाही. या गटातील मतांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. या गटात कमालीची चुरस असल्याने तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांसह अपक्षांनी चांगलीच हवी निर्माण केली होती.
कागल येथील हिंदुराव घाटगे विद्यालय केंद्रात विकास संस्था गटात सकाळी साडेअकरा वाजता तोबा गर्दी झाली होती. विद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांची गैरसोय लक्षात आल्यानंतर दुसरा बुथ लावण्यात आला. येथे राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे भैया माने, युवराज पाटील, तर शिवसेना-भाजप आघाडीचे बाबगोंडा पाटील व प्रकाश पाटील हे तळ ठोकून होते. निढोरीमध्येही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. येथे निवडणूक यंत्रणेने बुथची संख्या वाढविल्यानंतर गर्दी कमी झाली. येथे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, अमरीश घाटगे उपस्थित होते. राधानगरीमध्ये पणन प्रक्रिया गटासाठी एक केंद्र होते. मतदानासाठी उमेदवारांची चढाओढ दिसली. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, कृष्णराव किरूळकर, अमित पाटील, प्रा. जालंदर पाटील तळ ठोकून होते.
ग्रामपंचायत गटात उमेदवारांची संख्या कमी असल्याने मतदानासाठी तुलनेने वेळ कमी लागत होता. एकंदरीत तिरंगी लढतीमुळे सर्वच केंद्रांवर मतदानामध्ये चुरस दिसली. सायंकाळी पाचपर्यंत एका-एका मतासाठी चढाओढ होती.
कागल येथे नेत्यांच्या भेटी
कागल : येथे सेवा संस्था गटातील ५७२ मतदारांपैकी ७६७ मतदारांनी, तर ग्रामपंचायत गटातील १९० मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. येथे नावीद मुश्रीफ, युवराज पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने, भैया माने, मंडलिक कारखान्याचे संचालक चंद्रकांत गवळी, उमेदवार बाबगोंडा पाटील, कृष्णात पाटील, आशालता पाटील, विष्णू बुवा हे दिवसभर मतदान केंद्रावर होते.
मलकापुरात चुरशीने मतदान
मलकापूर : येथील जुनी नगरपालिका इमारत व कन्या शाळा येथे मतदान केंद्रावर मतदान सुरू होते. सेवा संस्था गटात ५८८ मतदानापैकी ४८८ (८२ टक्के), तर ग्रामपंचायत विभागात ५०७ मतदारांपैकी ३८४ (७५.५५ टक्के) मतदारांनी हक्क बजविला. केंद्रावर आमदार सत्यजित पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, मानसिंगराव गायकवाड, सभापती पंडित नलवडे, उपसभापती नामदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, जयवंतराव काटकर, उमेदवार बाबा लाड, शेखर येडगे, युवराज काटकर, नगरसेवक सुधाकर पाटील, भाजपचे राज प्रभावळकर होते.
नेत्यांमुळे गारगोटीत चुरस
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील तांबाळे, कडगाव, दारवाड येथे प्रत्येकी एक, तर गारगोटीत दोन ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सेवा संस्थांमधून २०७० पैकी २०५२ (८६.६८), तर ग्रामपंचायत गटातून ७६५ पैकी ६९० (९०.१९ टक्के)
मतदान झाले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेस आणि राजश्री शाहू आघाडीचे नेते माजी आमदार बजरंग देसाई, तर शिवसेना-भाजप आघाडीचे नेते आमदार प्रकाश आबिटकर, भाजप तालुका अध्यक्ष अलकेश कांदळकर, आदींनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
राधानगरीत ९४ टक्के मतदान
राधानगरी : राधानगरी तालुक्यात ९४ टक्के मतदान झाले. राधानगरी, कसबा तारळे, राशिवडे बुद्रुक व टोळेवाडी या चार केंद्रांवर हे मतदान झाले. सेवा संस्था गटात २३४० पैकी २१८६, (९३.४१ टक्के) व कृषी प्रक्रिया संस्था गटात ३७७ पैकी ३४९ (९२.५७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोतोली, पडळ केंद्रांवर शांततेत
कोतोली : कोतोली, पडळ येथील केंद्रांवर शांततेत चुरसीने मतदान झाले. कोतोली केंद्रावर एकूण १६ ग्रामपंचायतींचे १३२ पैकी १२६ (९७ टक्के) मतदान झाले. विकास सेवा संस्था गटामधून ३५ सोसायटींचे मतदान असून, ४२३ पैकी ३८४ (६५ टक्के) मतदान झाले. कोतोली केंद्रावर सकाळी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके, दुपारी आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी हजेरी लावली होती.
कळे केंद्रावर चुरस
कळे : कळे (ता. पन्हाळा) येथील केंद्रावर चुरशीने मतदान पार पडले. सहकारी संस्थांमध्ये ५९९ पैकी ५५७ (९३.४५ टक्के), तर ग्रामपंचायत प्रतिनिधी गटामध्ये १६४ मतदानापैकी १६१ (९८.१७ टक्के) मतदान झाले.
मतदारांसाठी धावपळ
कसबा तारळे : येथील मतदान केंद्रावर प्रचंड चुरशीने मतदान झाले. यावेळी विकास सेवा, कृषी, पणन व इतर गटासाठी ६८१ पैकी ६४० मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत विभागासाठी २४६ पैकी २३३ (९४ टक्के) मतदान झाले.

आजरेकर-वळंजू वाद
वालावलकर हायस्कूल मतदान केंद्राबाहेर व्यापारी गटातील मतदाराला आपल्या बाजूने घेण्यावरून उमेदवार नंदकुमार वळंजू व मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामुळे दोन्हीकडील समर्थक मोठ्या संख्येने जमून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. तोपर्यंत पोलीस या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोन्हीकडील समर्थकांना पिटाळल्याने पुढील अनर्थ टळला. दिवसभर या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली होती. त्यानंतर आजरेकर हे मतदान केंद्रात गेल्यावर त्यांना पोलिसांनी हटकले. यावर संतप्त झालेल्या आजरेकर यांनी तुम्ही आम्हालाच का अडवता? अपक्ष उमेदवार नंदकुमार वळंजू यांच्या समर्थकांना का अडवत नाही? अशी विचारणा केल्याने वादावादी होऊन तणाव निर्माण झाला.

हमाल-तोलाईदार गटांत मोठी चुरस

वालावलकर हायस्कूल केंद्रावर उमेदवार, समर्थकांची गर्दी
मुक्त सैनिक वसाहत येथील वालावलकर हायस्कूल मतदान केंद्रावर अडते-व्यापारी व पणन प्रक्रिया संस्था गटातील मतदान होते. केंद्राबाहेर राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी, कॉँग्रेस व शिवसेना-भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी पॅनेलसह अपक्ष उमेदवारांचे बूथ होते. येथे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी होती. सर्वजणच मतदारांना आवाहन करत होते. या केंद्रावर आ. हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

मंडलिक-मुश्रीफ हस्तांदोलन
वालावलकर हायस्कूल येथील केंद्रावर प्रा. संजय मंडलिक आले होते. याठिकाणी आ. हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफही थांबून होते. यावेळी एकमेकांना पाहून त्यांनी हस्तांदोलन केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Web Title: Booth fell incomplete, increased ranks of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.