बेवारस ‘बॅगे’मुळे बॉम्बची अफवा

By Admin | Updated: August 11, 2014 23:33 IST2014-08-11T23:09:49+5:302014-08-11T23:33:11+5:30

सांगलीतील घटना : तासभर एसटीची सेवा बंद; प्रवाशांत घबराट

Bombing rumors due to unprovoked 'baggage' | बेवारस ‘बॅगे’मुळे बॉम्बची अफवा

बेवारस ‘बॅगे’मुळे बॉम्बची अफवा

सांगली : वेळ दुपारी २.१५ ची... सांगलीच्या मुख्य बसस्थानकातील स्वच्छतागृहात सापडली एक बेवारस बॅग... अरे बॅग कुणाची आहे... काय आहे त्यामध्ये? लघुशंकेसाठी आलेल्या प्रवाशांमध्ये सुरु झाली उलट-सुलट चर्चा... चर्चेतून सूर निघाला, अरे बॅगेत बॉम्ब आहे... काही क्षणातच प्रवाशांनी भरलेले बसस्थानक रिकामे झाले... सांगलीचे बॉम्बशोधक पथक व श्वानपथक २.४५ वाजता दाखल झाले. पथकाने अवघ्या पंधरा मिनिटात बॅगेत काय आहे, याचा छडा लावला. बॅगेत कपडे, जेवण आणि अडीच हजाराची रोकड सापडल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात संपूर्ण पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी गुंतली होती. तेवढ्यात दुपारी अडीच वाजता पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाणला. ड्युटीवरील पोलिसाने दूरध्वनी घेतला. हा दूरध्वनी बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी केला होता. त्यांनी स्थानकातील स्वच्छतागृहात एक बेवारस बॅग असून, त्यामध्ये बॉम्ब असल्याची चर्चा सुरु झाली आहे, असे सांगितले. नियंत्रण कक्षाने ही माहिती बॉम्बशोधक पथकाला दिली होती. तोपर्यंत संपूर्ण शहरासह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ही बातमी पसरली होती. बसस्थानकातील प्रवासी भीतीने सैरावैरा पळत होते. अवघ्या पाच मिनिटात स्थानक रिकामे झाले होते. बसस्थानक परिसरातील दुकानेही पटापट बंद झाली. या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. बसची सेवाही बंद करण्यात आली होती. बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे, हवालदार तानाजी लाड, पोलीस नाईक दीपक ठोंबरे, विकास मांडके, समीर सनदी, मच्छिंद्र बर्डे यांचे पथक ‘मार्शल’ या श्वानासह पावणेतीन वाजता दाखल झाले.
त्यांनी बॉम्बशोधक यंत्राने बॅगची तब्बल तीनवेळा तपासणी केली. त्यानंतर ‘मार्शल’च्या मदतीनेही तपासणी केली. मात्र तपासणीत संशयास्पद काहीच वाटले नाही. त्यामुळे बॅग एका बाजूने कापण्यात आली. यामध्ये मळलेले कपडे, शाल, नवीन खरेदी केलेली अंडरवेअर, अडीच हजाराची रोकड व कपड्यामध्ये बांधलेले जेवण होते. बॉम्ब नसल्याची खात्री होताच पथकासह साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारी चार वाजता एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. (प्रतिनिधी)

बॉम्बशोधक पथकाने सापडलेली बॅग शहर पोलीस ठाण्यात जमा केली आहे. चोरट्यांनी प्रवाशाची चोरलेली ही बॅग असावी, यामध्ये काहीच न सापडल्याने ती स्वच्छतागृहात टाकून दिली असण्याची शक्यता आहे. अडीच हजाराची रोकड कपड्यात होती. चोरट्यांनी कपडे न उघडल्याने त्यांना ही रोकड दिसली नसावी.

Web Title: Bombing rumors due to unprovoked 'baggage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.