‘बॉम्ब’ फुटलाच नाही
By Admin | Updated: July 1, 2015 00:38 IST2015-07-01T00:38:42+5:302015-07-01T00:38:42+5:30
महापौर निवड : राष्ट्रवादी निवांत, कॉँग्रेसमध्ये निवडीनंतरही घालमेल

‘बॉम्ब’ फुटलाच नाही
संतोष पाटील -कोल्हापूर
महापौर निवडीसाठी जिल्हा बॅँकेचे राजकारण केंद्रबिंदू ठरले. प्रा. जयंत पाटील यांच्या स्वीकृत संचालकपदी निवडीस उशीर झाला असता तर कदाचित महापौरपदाची निवडणूक अटळ ठरली असती. जनसुराज्य पक्षाने महापौरपदाचा अर्ज नेऊन तयारीची चाहूल दिली होती. दुपारी प्रा. जयंत पाटील यांच्याकडून ‘काळजी करू नका, चर्चेतून मार्ग काढू’ असा निरोप आल्यानंतरच भाजप-शिवसेनेच्या मदतीने गोळाबेरीज करून शनिवारी महापौर निवडीवेळी ‘बिनआवाजाचा बॉम्ब’ फोडण्याची तयारी शांत झाली. मात्र, महापौर निवडीनंतर व पूर्वीही राष्ट्रवादी निवांत, तर कॉँग्रेसअंतर्गत घालमेल सुरूच असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील यांना एकटे पाडून त्यांची कोंडी करण्याचा डाव महापालिकेसह जिल्ह्याच्या सर्व सत्ताकेद्रांत सुरू आहे. यातूनच माजी महापौर माळवी यांना आमदार महादेवराव महाडिक समर्थकांनी खतपाणी घालत राजीनामा तब्बल पाच महिने लांबविला. दरम्यान, केडीसीसी बॅँकेत पाटील यांची कोंडी करीत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. याचा पलटवार म्हणून सतेज पाटील यांनी प्रा. जयंत पाटील यांच्याविरोधात फळी उभी करीत ‘सरां’ना बॅँकेचा पुढील दरवाजाच बंद केला.
दरम्यान, शासन व न्यायालयाच्या दणक्याने महापौरपदाचा मार्ग रिकामा झाला. चार महिन्यांसाठी कोणाला दुखवायचे असा यक्षप्रश्न पाटील यांच्यापुढे होता. ढोणुक्षे, डकरे की सूर्यवंशी असा निर्णय घेण्याची पाटील यांची कोंडी झाली. विरोधकांनीही महापौर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरू झाल्या. गटांतर्गत नाराजी थोपविण्यासह कॉँग्रेसच्या वाट्याला आलेले महापौरपद टिकविण्यासाठी सतेज पाटील समर्थकांना गेल्या २४ तासांत कस लावावा लागला. शारंगधर देशमुख व सचिन चव्हाण हे सतेज पाटील यांचे खंदे समर्थक प्रा. पाटील यांच्याशी चर्चा करून समेटासाठी सरसावले. दुपारी प्रा. पाटील यांची ‘के.डी.सी.सी.’च्या स्वीकृत संचालकपदी निवड जाहीर होताच महापौरपदाचाही तिढा सुटला.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडी अभेद्य आहे. आघाडीत बिघाड करण्याचा क धीही हेतू नव्हता आणि नाही. निवडणुकीच्या तोंडावर कटुता निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली. महापौर निवडीचा निर्णय हा सर्वस्वी कॉँग्रेसचा आहे. त्यामुळे मी पडद्यामागे हालचाली किंवा घडामोडी करण्याचा प्रश्नच येत नाही. - प्रा. जयंत पाटील, नगरसेवक
तिढा सुटला तरी पेच कायम
महापौरपदाचा तिढा सुटला तरी समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रश्न सतेज पाटील यांच्यापुढे ‘जैसे थे’ आहे. निवडणुकीच्या तोंडावर औटघटकेचा महापौर करताना नंदकुमार सूर्यवंशी व सुरेश ढोणुक्षे यांची नाराजी पाटील यांना ओढवून घ्यावी लागली. महापौर निवडीनंतर राष्ट्रवादी निवांत झाली. महापौरपदाचा तिढा सुटला तरी पेच कायम असल्याचे सतेज पाटील गटातील चित्र आहे.
काँग्रेस कमिटीत विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम गर्दी
विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. महापौर निवडीच्या मुलाखती कॉँग्रेस कमिटीत आयोजित केल्याने गेल्या काही महिन्यांनंतर प्रथमच कॉँग्रेस कमिटी कार्यालय नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलले होते.