पन्हाळा-शाहूवाडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: January 14, 2015 00:33 IST2015-01-13T20:16:57+5:302015-01-14T00:33:55+5:30
कारवाई करण्याची मागणी : चुकीचे उपचार बेतले अनेक रुग्णांच्या जिवावर

पन्हाळा-शाहूवाडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
देवदास वरेकर - पन्हाळा शाहूवाडी तालुक्यांत गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या बोगस डॉक्टरांच्या उपचारांमुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याची उदाहरणे आहेत.
पन्हाळा तालुक्यातील कोलिक, पडसाळी, बांदिवडे, बांदेवाडी, धामणी खोरा तसेच शाहूवाडी तालुक्यातील उदगीर, विशाळगड, येळवणजुगाई, कासारवाडी, सोनुर्ले, धनगरवाडा, आदी ठिकाणी या डॉक्टरांचा व्यवसाय चालू असून, यापैकी काही ठिकाणच्या डॉक्टरांचा व्यवसाय चालू असून, यापैकी काही ठिकाणच्या डॉक्टरांनी यापूर्वी चुकीची उपचारपद्धती करून खळबळ माजवून दिली होती. या चुकीच्या उपचारांमुळे अनेकांना इहलोकीची यात्रा करावी लागली आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडूनही हा व्यवसाय करणारे डॉक्टर नामानिराळेच राहिल्याने तालुक्यातील जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी शासनाने बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी एक समिती स्थापन करून कारवाई करण्याची मोहीम उघडली होती. त्यावेळेपुरता या डॉक्टर महाशयांनी आपला बाडबिस्तारा गुंडाळला होता. मात्र, पुन्हा या व्यवसायाने जोर धरल्याचे दोन्ही तालुक्यांत पाहावयास मिळत आहे.
यापूर्वी बोगस डॉक्टरांवर छापा टाकून त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही तालुक्यांतील एकाही बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली नसल्याने शासनाचा आदेश कागदावरच राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन पातळीवरून अशा डॉक्टरांविषयी प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे सावधगिरी बाळगली जात आहे. या डॉक्टरांच्याकडे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नसल्याने हे बोगस डॉक्टर रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळतात. दोन्ही तालुक्यांत असा व्यवसाय करणाऱ्यांपैकी काहीजण हा एकच व्यवसाय करीत आहेत. अति उच्च क्षमतेचे अंतिम स्थितीत द्यायचे औषध रुग्णाला सुरुवातीलाच देण्यात येत असल्याने अशा डॉक्टरांकडे रुग्णांना तत्काळ तात्पुरता ‘गुण’ येत असला, तरी हाच उपाय काही रुग्णांना जीवघेणा ठरला आहे.