मलकापूर शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: August 5, 2014 23:38 IST2014-08-05T21:53:32+5:302014-08-05T23:38:57+5:30
हे डॉक्टर रुग्णांना कर्नाटकात तपासणीसाठी पाठवितात

मलकापूर शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
राजाराम कांबळे - मलकापूर शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला या डॉक्टरांकडून राजरोसपणे लुबाडले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरू लागली आहे. शाहूवाडी तालुक्यात १२१ गावे २५० वाड्या, वस्त्या आहेत. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत ही गावे वसली आहेत. दळण-वळणाची अपुरी सुविधा आहे. शहरापासून खेडेगावचे अंतर सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर आहे. जंगलाच्या शेजारी धनगरवाडे आहेत. याचा फायदा घेऊन दहावी-बारावी पास डॉक्टर ग्रामीण भागात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांवर राजरोसपणे डॉक्टर वैद्यकीय उपचार करीत आहेत. या उपचारांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही बोगस डॉक्टरांनी खेडेगावांत रुग्णालये थाटली असून, कोणतीही पदवी नसताना रुग्णालयाच्या बोर्डवर बी.ए.एम.एस., बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ या पदव्या झळकत आहेत. तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी अशी समिती आहे. मात्र, अद्याप या समितीने बोगस डॉक्टरांची तपासणी केल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जिवांशी हे बोगस डॉक्टर खेळत आहेत. कंपाऊंडरच झाले डॉक्टर डॉक्टरांच्या हाताखाली काम केलेले कंपाऊंडर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करीत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. सोनवडे येथील बोगस डॉक्टर संजय शिंदे याने वारणा कापशी येथील महिलेचा अवैधरीत्या गर्भपात करताना मृत्यू झाला आहे. गर्भलिंग तपासणीला बंदी असताना हे डॉक्टर रुग्णांना कर्नाटकात तपासणीसाठी पाठवितात. या बोगस डॉक्टरांची मोठी साखळी आहे. यामध्ये ग्रामीण भागांतील डॉक्टर सामील असल्याचे बोलले जाते.