बोगस लाभार्थी शोधमोहीम सोमवारपासून
By Admin | Updated: December 10, 2014 23:53 IST2014-12-10T23:21:44+5:302014-12-10T23:53:29+5:30
शासकीय योजना : लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार; मोहीम १५ जानेवारीपर्यंत चालणार

बोगस लाभार्थी शोधमोहीम सोमवारपासून
कोल्हापूर : शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सोमवार (दि. १५)पासून ही मोहीम सुरू होईल. ही मोहीम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. ही मोहीम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे बोगस लाभार्थी शोधून कारवाई करणे व पात्र लाभार्थ्यास लाभ देणे, हा आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, अशा काही योजना आहेत. या योजनांची तलाठ्यांतर्फे अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थी निवडीसाठी समिती असते, परंतु अपात्र असला तरी कागदोपत्री पात्र ठरवून या योजनेत ‘घुसडण्या’चा प्रयत्न होतो. यामुळे काहीजण अपात्र असूनही लाभ घेत असतात. पात्र मात्र लाभापासून वंचित राहतात. यामुळे शासनानेच अपात्र लाभार्थी शोधून काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याप्रमाणे शोधमोहिमेचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०१५ अखेर तलाठी आपल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी घेऊन पहिल्यांदा गावसभेत वाचन करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन पडताळणी होणार आहे. या मोहिमेत अपात्र लाभार्थ्यापर्यंत यंत्रणा पोहोचू नये, यासाठी राजकीय हस्तक्षेप होणार, हे गृहीत धरूनच प्रशासनाने तयारी केली आहे. यावेळी कटाक्षाने बोगस लाभार्थी शोधावेत, अशा सूचना बैठकीत तलाठ्यांना दिल्या आहेत.
सध्या पन्हाळा, भुदरगड, राधानगरी तालुक्यांतून बोगस लाभार्थ्यांसंबंधी तक्रारी आल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात अपात्र लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अपात्र लाभार्थी मिळाल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, लाभाची रक्कम वसूल करणे, अशी कारवाई केली जाणार आहे. दोषी आढळल्यास तलाठ्यांवरही प्रशासकीय कारवाई होणार आहे.
- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)