बोगस लाभार्थी सापडूनही डोळेझाक

By Admin | Updated: July 15, 2017 00:07 IST2017-07-15T00:07:27+5:302017-07-15T00:07:27+5:30

बोगस लाभार्थी सापडूनही डोळेझाक

Bogus beneficiaries hide behind the traps | बोगस लाभार्थी सापडूनही डोळेझाक

बोगस लाभार्थी सापडूनही डोळेझाक


विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दूधगंगा प्रकल्पाच्या संकलन रजिस्टरमध्ये नोंद नाही; परंतु तरीही त्यांना जमीन वाटप झाल्याची तक्रार झाली. हे संकलन रजिस्टर याचिकेत उच्च न्यायालयातही सादर झाले. हे बोगस लाभार्थी असल्याचे तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे; परंतु तरीही त्याकडे डोळेझाक करून अशा लोकांना जमिनीचे वाटप झाले आहे.
सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दोन प्रकरणांत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या आहेत. गावपातळीवरील मंडल अधिकाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सोयीनुसार अहवाल देऊन, खोटे शिक्के, पत्रे देऊन असे व्यवहार झाले आहेत. हे करून देण्यात काही निष्णात वकिलांचीही यंत्रणेने मदत घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसते.
सिद्धनेर्लीतील रणजित रघुनाथ मगदूम यांनी या दोन प्रकरणांबाबत तक्रार केली आहे; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद द्यायला तयार नाही. बोगस संकलन रजिस्टरमध्ये नाव असलेल्या करुणा बाबर घाटगे यांच्या नावे गट नंबर ७१ पैकी ४० आर जमीन नोंद आहे. ही जमीन त्यांना कार्यासन १५ / पुनर्वसन आर. आर. ७३, दि. ३१ आॅक्टोबर १९९६ च्या आदेशान्वये मंजूर झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसा जबाब त्यांनी २५ डिसेंबर २०१६ रोजी कागल पोलिसांना दिला आहे. त्या जबाबात त्या म्हणतात की, माझा जन्म निपाणी येथे झाला आहे. माझे पूर्वीचे गाव भांडणे-हुडा, बांबर्डे ग्रामपंचायतीअंतर्गत होते. या गावी मी आईसोबत राहात होते. माझे पहिले ते पाचवीपर्यंतचे शिक्षण विद्यामंदिर दांडगाईवाडी (ता. करवीर) व दहावीपर्यंतचे शिक्षण फुलेवाडीच्या गुरुदेव विद्यानिकेतनमध्ये झाले. म्हणजे जन्म निपाणीचा, राहायला राधानगरी तालुक्यात आणि पहिलीच्या शिक्षणासाठी त्या कोल्हापूरजवळ दांडगाईवाडीला येत असत, असे कागदपत्रांवरून दिसते. जन्मदाखल्यावर त्यांचे नाव खैरून अब्दुल शेख असे असून १९७७ ते
७८ला त्या दहावीत शिकत होत्या. त्यांनी स्वत:च १५ डिसेंबर २०१५ ला जमिनीवरील सात-बारा पत्रकी ‘इतर हक्कांतील नवीन व अविभाज्य शर्तींवर प्रदान’ असा शेरा कमी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र केले आहे. त्यात मात्र त्या माझे लग्नापूर्वीचे नाव करुणा बाबर घाटगे असे असून, लग्नानंतर बदल होऊन खैरूनबी बाबर कलावंत असे झाल्याचे सांगत आहेत. तक्रारदारांनी बांबर्डे गावाची १९८०ची मतदार यादी माहितीच्या अधिकाराखाली मिळविली तर त्यामध्ये घाटगे आडनावाचे एकही कुटुंब त्या गावात नाही. त्यांना पुनर्वसन विभागाकडून मिळालेली जमीन १५ मार्च २०१६ च्या दस्तान्वये त्यांनी त्याच गावातील माणिक मधुकर पाटील यांना विक्री केली.
दुसऱ्या एका प्रकरणात रजिस्टर नंबर ९४ ला आनंदी बाबू पाटील यांच्या नावे गट क्रमांक ७१ पैकी ४१ आर जमीन संकलन रजिस्टरमध्ये दिसते. ही जमीन पुनर्वसन १५/ आर.आर. ७३-१९९६, दि. ३१ आॅक्टोबर १९९६ च्या आदेशान्वये सिद्धनेर्ली येथील गट क्रमांक ७१ पैकी ४१ आर. या जमिनीचा आनंदी बाबू पाटील यांना कब्जा देण्यात आला, असे म्हटले आहे. कब्जापट्टी पंचनाम्यावर ३ डिसेंबर १९९६ अशी तारीख आहे. त्यावर पाटील यांची सही आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या मूळ आदेशावरही त्यांचे नाव आनंदी बाबू पाटील असेच आहे; परंतु हे नाव हस्तदोषाने लागले असल्याचा अहवाल ३ आॅक्टोबर २०१५ रोजी सिद्धनेर्लीच्या मंडल अधिकाऱ्यांनी दिला व आनंदी यांच्या पतीचे नाव बाळूऐवजी चुकून बाबू लागले असल्याने हे दुरुस्त करण्यात हरकत नाही, असे सुचविले. त्यानुसार बदल होऊन व पुढे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना शर्त काढून ‘वर्ग एकची जमीन’ अशी नोंद करण्यास परवानगी दिली. त्याचा आधार घेऊन त्यांनी ही जमीन त्याच गावातील माणिक मधुकर पाटील यांना विक्री केली आहे. हा व्यवहार २६ एप्रिल २०१६ रोजी झाला आहे. त्यावर त्यांचा अंगठा आहे. जमीन विक्रीसाठी पुनर्वसन विभागाची परवानगी मागितली, त्यावरही त्यांचा अंगठाच आहे; परंतु त्याच्या अगोदर तब्बल २४ वर्षांपूर्वी केलेल्या कब्जेपट्टी पंचनाम्यावर मात्र त्यांची सही आहे; म्हणजे लोक अगोदर निरक्षर असतात आणि नंतर साक्षर होतात; पण इथे मात्र सगळेच उलटे घडले आहे! (क्रमश)
कर्मचाऱ्यांचा मुक्काम हलवा
दूधगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारास तत्कालीन अधिकाऱ्यांचे पाठबळ होते हे खरे असले तरी या जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील अपवाद वगळता बहुतांश कर्मचारीही या प्रक्रियेचा घटक बनले असल्याची माहिती आहे. त्यामुळे थोडे काम कमी झाले तरी चालेल; परंतु सध्याचा या कार्यालयातील कर्मचारी वर्ग तेथून हलविण्याची गरज आहे. अनेक वर्षे तिथे काम करून त्यांचे लागेबांधे तयार झाले आहेत.
त्यामुळे हे लोक अधिकाऱ्यांनाही माहीत सादर करताना अपुरी व दोषपूर्ण कामे तयार करतात, असे निदर्शनास आले आहे. म्हणजे एक जमीन एका प्रकल्पग्रस्ताला द्यायची, त्याची तशी आॅर्डर काढायची; परंतु ताबा द्यायचा नाही; परत तीच जमीन दुसऱ्याला कुणाला तरी वाटप करायची व त्याला मात्र ताबा तत्परतेने द्यायचा, असे घडले आहे.
गैरप्रकार सिद्ध झाल्यास शिक्षेस तयार!
दूधगंगा प्रकल्पामध्ये मी कोणताही गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाल्यास धरणग्रस्त जी शिक्षा देतील, ती भोगावयास तयार असल्याचे कागल वसाहतीतील धरणग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते बाबूराव एकनाथ पाटील यांनी म्हटले आहे.
त्यांच्या मते, धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मी अनेक आंदोलने केली आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु मी कोणताही घोटाळा केलेला नाही की कुणाचीही जमीन हडप केलेली नाही. माझ्याकडे असणारी जमीन धरणग्रस्त म्हणून मिळालेली नाही आणि स्वकष्टातून आमच्या कुटुंबाने ती खरेदी केली आहे.

Web Title: Bogus beneficiaries hide behind the traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.