कागलमध्ये बोगस पोस्टल मतदान
By Admin | Updated: October 17, 2014 22:53 IST2014-10-17T22:50:30+5:302014-10-17T22:53:42+5:30
संजय घाटगे, मंडलिक यांचा आरोप : चौकशी करण्याची मागणी

कागलमध्ये बोगस पोस्टल मतदान
कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक यंत्रणेतील कच्चे दुवे हाताशी धरून लष्करातील सुमारे ७०० जवानांचे बोगस पोस्टल मतदान केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार संजयबाबा घाटगे व शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी आज, शुक्रवारी येथे केला. लष्करातील जवानांच्या नावे बोगस मतदान करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
कागल पोस्ट आॅफिससमोरील पोस्टाच्या पेटीत एकाच वेळी ६०० ते ७०० पोस्टल मतपत्रिका आढळून आल्यानंतर घाटगे व मंडलिक यांना संशय आला. लष्करातील जवानांना पाठविलेल्या पिवळ्या रंगाच्या मतपत्रिका एकाच वेळी कशा येऊ शकतील, अशी शंका बळावल्यानंतर आज दिवसभर या प्रकरणाचा पाठपुरावा केला; तसेच अधिक माहिती घेतली. त्यावरून या पोस्टल मतपत्रिका बोगस असल्याचे त्यांचे ठाम मत झाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजाराम माने, निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह, पोस्ट खात्याचे अधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जवानांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
सायंकाळी घाटगे व मंडलिक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. घाटगे म्हणाले, ‘ कागल तालुक्यातील जवानांच्या मतपत्रिका हसन मुश्रीफ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हायजॅक’ केल्या आहेत. मतपत्रिका असलेल्या लखोट्यावर लष्कराचे बोगस शिक्के व सह्या आहेत. कागलमध्ये लष्कराचे कसलेही केंद्र नसताना एवढ्या मोठ्या संख्येने मतपत्रिका कागलच्या पोस्टात पडल्यामुळे संशय वाढला आहे. शहानिशा केल्याशिवाय पोस्टल मतपत्रिका मोजणीसाठी घेऊ नयेत. जवानांचे मतदान पुन्हा घ्यावे. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.