यळगूडमधील खून झालेल्या मुलीचा मृतदेह मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:11+5:302021-08-25T04:30:11+5:30
हुपरी: सावत्र बापाने पंचगंगा नदीत ढकलून दिलेल्या यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली युवराज साळुंखे (वय ९) या मुलीचा मृतदेह ...

यळगूडमधील खून झालेल्या मुलीचा मृतदेह मिळाला
हुपरी: सावत्र बापाने पंचगंगा नदीत ढकलून दिलेल्या यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली युवराज साळुंखे (वय ९) या मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी पंचगंगा नदीपात्रात मिळून आला. चिमुकल्या प्रणालीचा मृतदेह पाहताच तिच्या आईसह इतर नातेवाइकांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे मन हेलावून गेला. निर्दयी पिता युवराज याला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोकोबरोबरच गावात बंद पाळण्यात आला. दरम्यान, प्रणालीच्या खूनप्रकरणी सावत्र पिता युवराज आत्माराम साळुंखे (वय ४०) याच्यावर हुपरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटकेची कारवाई केली असून, त्याला आज, बुधवारी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या वाहनातून काढण्यात आलेल्या प्रणालीच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जमाव सहभागी झाला होता. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण गावातील गल्लोगल्ली रांगोळी व फुलांचा सडा अंथरण्यात आला होता. निष्पाप मुलीचा अत्यंत निर्दयीपणे सावत्र पित्यानेच खून केल्याच्या या घटनेचा समाजातील विविध स्तरातून निषेध होत असून, संतापाची लाट उसळली आहे. यळगूड येथील प्रणाली साळुंखे ही अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. सावत्र पिता युवराज साळुंखे यानेच तिला पळवून नेऊन पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. कालपासून पंचगंगा नदीपात्रामध्ये प्रणालीचा शोध सुरू होता. मंगळवारी पहाटेपासून नगरपालिकेच्या आपत्कालीन पथकाकडून शोध घेण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीपात्रात स्मशानभूमीच्या समोरील बाजूस शिरदवाडच्या बाजूकडील पात्रात एका झुडपात प्रणालीचा मृतदेह मिळून आला. नातेवाईकही सकाळपासूनच शोधकार्याच्या ठिकाणी थांबून होते. चिमुकल्या प्रणालीचा मृतदेह पाण्याबाहेर काढताच तिची आई, मामा तसेच अन्य नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, हुपरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, आदींनी धाव घेतली. नातेवाईक तसेच नागरिकांनी यावेळी निर्दयी पिता युवराज याला कठोरातील कठोर शिक्षा करावी, त्याला फाशी द्यावी अशी मागणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा लागावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले.
-------::------ फोटो ओळी-1) चिमुकल्या प्रणालीच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जमाव उपस्थित होता. 2) निर्दयी पिता युवराज याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्याकडे केली. 3) दुर्दैवी प्रणाली. 4) सावत्र पिता युवराज साळुंखे.