पैशाच्या वादातून तरुणाचा खून
By Admin | Updated: June 2, 2015 01:24 IST2015-06-02T01:24:52+5:302015-06-02T01:24:52+5:30
वाठारजवळील घटना : पोखलेच्या एकावर गुन्हा; संशयित आरोपीचे पलायन

पैशाच्या वादातून तरुणाचा खून
पेठवडगाव : पत्नीस मिसकॉल करण्याबरोबरच बांधकामाच्या पैशाच्या वादातून झालेल्या मारामारीत शरीफ इक्बाल पटाईत (वय २७, रा. वाठार तर्फ वडगाव) याचा खून झाला.
ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास वाठार येथील साखरवाडी येथे घडली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी बालम पठाण (रा. पोखले) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
घटनास्थळ व पेठवडगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वाठार येथील साखरवाडी वसाहतीत शरीफ पटाईत याचे घर आहे. सोमवारी दुपारी त्याचा पोखले (ता. पन्हाळा) येथील नातेवाईक बालम पठाण कामानिमित्त आला होता. पठाण यास बांधकाम करण्याचे काम दिले होते; पण त्याने अर्धेच बांधकाम केले. या कामाचे पैसे पटाईत यांनी भागवले होते. उर्वरित काम पटाईत याने अन्य गवंड्यामार्फत पूर्ण करून घेतले.
दरम्यान, बालम पठाण, त्याचे वडील गुलाब, भाऊ जमाल वरचेवर फोन करून वारंवार पैशाची मागणी करत तसेच शिवीगाळ करीत. त्यामुळे पठाण व पटाईत यांच्यात तणाव होता. सोमवारी (दि. १ जून) दुपारी दीड वाजता बालम पठाण घरी आलाहोता. यावेळी त्याने शरीफ यास बायकोस मिसकॉल करतो, यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी शरीफने मिसकॉल केला नाही, असे सांगत असताना, पठाण याने थोबाडीत मारली. तसेच डोक्याचे केस धरून डोके सिंमेटच्या चौकटीवर आदळले. त्यामुळे शरीफ हा कपाळावर मार लागल्यामुळे जखमी झाला. त्यानंतर पठाण हा मोटारसायकलवरून पळून गेला. जखमी शरीफला उपचारासाठी वडगाव येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तथापि डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी नवे पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
याबाबत रमजान इक्बाल पटाईत याने पोलिसांत फिर्याद दिली. तपास पोलीस उपअधीक्षक चिन्मय पंडित, सहाय्यक फौजदार शिवाजी कोळी करीत आहेत.
वर्षापूर्वी शरीफचे लग्न
शरीफ हा सध्या फॅब्रिकेशनची कामे करीत होता. तसेच चार वर्षांपूर्वी दुबई येथे नोकरीस होता. वर्षापूर्वी लग्नासाठी भारतात परतला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. शरीफ याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.