कोल्हापुरात रक्ताची टंचाई, रक्तदानासाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:48+5:302021-07-04T04:17:48+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राेज सरासरी २५० बाटल्या रक्ताची गरज आहे, मात्र त्याप्रमाणात रक्तदान होत नसल्याने नियमित रक्ताची गरज ...

कोल्हापुरात रक्ताची टंचाई, रक्तदानासाठी पुढे या
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राेज सरासरी २५० बाटल्या रक्ताची गरज आहे, मात्र त्याप्रमाणात रक्तदान होत नसल्याने नियमित रक्ताची गरज असलेले रुग्ण, गरोदर माता, अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया करावे लागणारे रुग्ण यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, या सामाजिक कार्याचे पाईक म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना व आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लड बँकांमध्ये रक्ताच्या पिशव्या अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी १८ ते ६५ वयोगटातील व वजन किमान ४५ किलोपेक्षा जास्त असेल अशा सर्व नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे. अनेकदा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव अशा विविध उत्सवांच्यादरम्यान रक्तदान केले जाते. त्याकाळात रक्ताची फारशी कमतरता भासत नाही; मात्र इतरवेळी विशेषत: सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात रक्ताची मागणी अधिक आहे.
---
जिल्ह्यातील एकूण बल्ड बँका : १३
रोजची रक्ताची गरज : २५० बाटल्या
शिल्लक रक्त : १ हजार २०५ बाटल्या
----
चार प्रकारे वापर
संकलित केलेल्या रक्ताच्या ७ प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, त्यात दोष आढळला तर त्याचा वापर केला जात नाही. एका रक्ताच्या पिशवीचा चार वेगवेगळ्या कारणांसाठी वापर होतो. प्लेटलेट पेशी ज्यांचा वापर डेंग्यू, कॅन्सरग्रस्तसारख्या रुग्णांवर केला जातो. तांबड्या पेशी सर्व प्रकारचे रुग्ण, प्रसूती, अपघातग्रस्त, विविध शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, ॲनिमिया अशा कारणांसाठी उपयुक्त असते. प्लाझ्माचा वापर जळणे, हृदयशस्त्रक्रिया, नवजात बालके, जीबी सिंड्रोम आजार असलेल्यांसाठी होतो. तर क्राईव्ह प्रेसिपेट याचा वापर अंतर्गत रक्तस्त्राव होत असेल तर केला जातो.
---
महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. अनियमित मासिक पाळी, सकस अन्नाचा अभाव अशा कारणांमुळे अनेकदा सरासरी टक्केवारीपर्यंत महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढत नाही. भारतात महिलांचे रक्तदानाचे प्रमाण केवळ ६ टक्के इतके आहे.
-