बनावट नोटाप्रकरणी तरुणीस कोठडी
By Admin | Updated: July 5, 2014 01:05 IST2014-07-05T00:53:35+5:302014-07-05T01:05:10+5:30
बनावट नोटा तयार करून खपविण्याचा अजब प्रकार

बनावट नोटाप्रकरणी तरुणीस कोठडी
कागल : साध्या झेरॉक्स कागदावर प्रिंटरच्या साहाय्याने नोटांच्या दोन्ही बाजू छापून त्याद्वारे बनावट नोटा तयार करून खपविण्याचा अजब प्रकार करणाऱ्या कुर्ली (ता. चिकोडी) येथील तेजस्विनी जयसिंग पाटील (वय २४) या युवतीस कागल पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. खेडेकर यांनी तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे तिची रवानगी कोल्हापूर येथील सबजेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, तिचे कोणी नातेवाईकही कागल पोलीस ठाण्याकडे फिरकलेले नाहीत.
काल, गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. येथील बंगलोर अय्यंगार बेकर्समध्ये चार दिवसांपूर्वी तिने अशी बनावट नोट खपविली होती. त्यामुळे सतर्क मालकाने कागल पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी आरोपी तेजस्विनी हिला अटक करून तपासासाठी तिच्या कुर्ली गावातील घरात नेले असता तेथे रंगीत झेरॉक्स निघू शकणारा प्रिंटर, मोबाईल फोन, कात्री असा मुद्देमाल सापडला. मात्र, त्यामध्ये कोणताही विशेष दखल घ्यावा असा ऐवज नव्हता. आरोपी महिला साधा कागद वापरून ही बनावट नोट तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले. कागल पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता ती एकाकी राहात असल्याने आणि उपजीविकेसाठी पैसे कमी पडू लागल्याने तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले. (प्रतिनिधी)