अंत्यसंस्कारासाठी चक्क ‘ब्लॅक’चं रॉकेल!

By Admin | Updated: April 12, 2015 23:58 IST2015-04-12T21:44:22+5:302015-04-12T23:58:17+5:30

परळी खोरे : माणूस गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून नातेवाइकांना करावी लागतेय शोधाशोध

Black 'kerosene' for funeral! | अंत्यसंस्कारासाठी चक्क ‘ब्लॅक’चं रॉकेल!

अंत्यसंस्कारासाठी चक्क ‘ब्लॅक’चं रॉकेल!

विशाल गुजर -परळी -प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आजही कमी नाहीत, याची प्रचिती परळी खोऱ्यात येते. अंत्यसंस्कारासाठी मिळणारा रॉकेलचा कोटाही संपवला जात असल्याने नातेवाइकांना जवळचा माणूस गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून ब्लॅकने कोठे रॉकेल मिळेल का, याचा शोधशोध करावी लागत आहे.‘जाताना सरणावर, इतुकेच मला कळले होते..., मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...! गझलकार सुरेश भट्ट यांच्या कवितेतील या ओळी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. सामान्यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष मरणानंतरही चालूच असतो, हे दुर्दैव. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्यांना रॉकेलच्या भीषण टंचाईला नेहमीच सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या स्वयंपाकासाठी सोडाच; पण अनेकदा अंत्यसंस्कारासाठीही सहजासहजी रॉकेल मिळत नाही. अशावेळी काळ्या बाजारातून रॉकेल आणावे लागते. असाच धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी अनुभवास मिळाला. सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ग्रामीण डोंगराळ भागात गुरुवार, दि. ९ रोजी दुपारी घडला. राज्य शासनाने जानेवारी २०१५ पासून रॉकेल कपातीचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. शासन दरवेळी नवनवीन निर्णय घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून सलग दोन महिने रॉकेलच्या साठ्यात कपात केली होती. त्यानंतर ‘गुड न्यूज’ आली. मार्च-एप्रिलमध्ये कोट्यात आठ ते दहा टक्क्यांने वाढ करण्यात आली. मात्र, तरीही सर्वसामान्यांना पुरेसे रॉकेल मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी रॉकेलचा स्वतंत्र कोटा असावा, असा कोणताही निर्णय नाही. त्या पद्धतीने वितरीतही केले जात नाही. त्यामुळे आधीच अर्धमेल्यासाठी अवस्था झालेल्यांची रॉकेलसाठी वणवण करावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी तरी जादा कोटा द्यावा, अशी मागणी होत आहे.

काहीवेळा माणुसकीही हरते
कोणाच्या घरी दु:खद घटना घडल्यानंतर अख्खं गाव एकत्र येत असतं. अशावेळी रॉकेल विक्रेतेही हळवे होऊन अशा कुटुंबीयांना हवे तेवढे रॉकेल देऊन सहकार्य करत असतं. मात्र शासनाकडूनच अपुरा कोटा येत असल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक’ने रॉकेल घेण्याशिवाय मार्गच उरत नाही.


जिल्ह्याच्या दुर्गम भागात गोची
महाबळेश्वर, पाटण, कोयना, जावळीसह सातारा तालुक्यांतील परळी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेक गावात स्मशानभूमीला शेडही नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे अवघड होते. त्यामुळे या परिसरात तरी अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र रॉकेलचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.


विद्युत दाहिनीचा अभाव
मोठ्या शहरात अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी असते; मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी विद्युत दाहिनी नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडे, गोवरी, रॉकेल यांचाच आधार घ्यावा लागतो.


पूर्वीपासूनच जास्त रॉकेलची मागणी केली जात आहे; मात्र शासनाकडूनच कमी रॉकेल येत असून, दर महिना ३१ टक्के रॉकेल पुरवठा होत असतो. मागणीच्या तुलनेत रॉकेलचा पुरवठा कमी येत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या रॉकेलच्या कोट्यातून वाटप करावे लागते. हे वाटप करतााना कसरत करावी लागते.
- शमा पवार,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Black 'kerosene' for funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.