भाजपचे यश; मोदींची नव्हे समितीची कृपा : जारकीहोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:05+5:302021-09-09T04:30:05+5:30
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा फायदा मिळाल्याने भारतीय जनता पक्ष विजयी ...

भाजपचे यश; मोदींची नव्हे समितीची कृपा : जारकीहोळी
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा फायदा मिळाल्याने भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरेंच्या जादूमुळे आपल्याला विजय मिळाला असे समजू नये. विशेषत: बेळगाव दक्षिण मतदार संघातील बऱ्याच प्रभागांमध्ये समितीचे एकाहून अधिक उमेदवार उभे असल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जी मते समितीला पडली ती मते समितीकडे अद्याप शाबूत आहेत. तेव्हा जर सर्व मतांची बेरीज केली तर भाजपला जी मते पडली, ती समितीची मराठी भाषिकांची मते आहेत. एकंदर महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीने भाजपला तारले आहे.
हा काही लौकिकदृष्ट्या भाजपचा विजय नाही, असे आमदार जारकीहोळी म्हणाले.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, समितीची व्हॉट बँक अद्याप त्यांच्याकडेच आहे. लोकसभा पोटनिवडणुकीतील आपली सर्व मते समितीने अद्याप आपल्याकडे शाबूत ठेवली आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २० उमेदवार विजयी होतील, अशी आमची अपेक्षा होती; परंतु दहाजण पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत आणि अन्य अपक्ष पाच असे एकूण १५ नगरसेवक काँग्रेसने निवडून आणले आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघातील तीन आणि बेळगाव उत्तर मतदार संघातील पाच ठिकाणी आमचा अपेक्षाभंग झाला, अन्यथा काँग्रेसचे २० नगरसेवक महापालिकेवर निवडून आले असते, असेही आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले. मागील महापालिका सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ नगरसेवक होते. मात्र यावेळी फक्त चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ भाजपने वर्चस्व मिळाले मिळविले असले तरी आम्ही मोठे लक्ष्य समोर न ठेवता १५ जागा जिंकल्या आहेत. एकंदर समितीमधील दुहीचा फायदा भाजपला मिळाला आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले.