भुदरगडमध्ये भाजपचे स्थान भक्कम
By Admin | Updated: May 11, 2016 00:56 IST2016-05-10T21:48:45+5:302016-05-11T00:56:07+5:30
सुरेश हाळवणकर : तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

भुदरगडमध्ये भाजपचे स्थान भक्कम
गारगोटी : भुदरगड तालुक्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले असून, भविष्यात तालुक्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तालुक्याचे राजकारण पूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष व यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष नामदार हिंदुराव शेळके हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई हे होते.
यावेळी बोलताना आमदार हाळवणकर पुढे म्हणाले, भुदरगड तालुक्याला पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी भरघोस निधी दिला असून, त्याच्या माध्यमातून विकासाची गंगोत्रीच अवतरली आहे. त्याचा प्रसार करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी बोलताना नामदार हिंदुराव शेळके म्हणाले, भाजपचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखेला भेट दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना इथल्या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलेल्या नाहीत. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल देऊन अशा ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
दरम्यान, मेळावा सुरू होण्यापूर्वी भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नामदार शेळके व आमदार हाळवणकर यांचे गारगोटी ते आकुर्डे असे मोटारसायकल रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील यांनी आढावा घेतला.
यावेळी मौनी विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी अलकेश कांदळकर, उपाध्यक्ष संतोष पाटील, सुनील पाटील, सरचिटणीस नामदेव चौगले, सुनील तेली, विनायक देसाई, गारगोटी शहराध्यक्ष राहुल चौगले, रणजित आडके, ए. डी. कांबळे, अशोक येलकर, आनंदा रेडेकर, सुरेश सुतार, विक्रम पोवार, विनायक परुळेकर, भगवान शिंदे, रोहित देसाई, राजेंद्र पाटील, अवधूत राणे, अशोक चौगले, जोतीराम शिंदे, स्वप्निल देवेकर, निवास देसाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. हिंदुराव पाटील यांनी स्वागत, तर योगेश परुळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य धनाजीराव मोरस्कर यांनी आभार मानले. सुशांत मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी व्यासपीठावर नाथाजी पाटील, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, अलकेश कांदळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.