गडमुडशिंगीत कॉँग्रेससमोर भाजपचे तगडे आव्हान; इच्छुकांची मांदियाळी
By Admin | Updated: January 21, 2017 00:09 IST2017-01-21T00:09:37+5:302017-01-21T00:09:37+5:30
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण : उमेदवारी देण्यावरून सर्वच पक्षातील नेत्यांचा लागणार कस

गडमुडशिंगीत कॉँग्रेससमोर भाजपचे तगडे आव्हान; इच्छुकांची मांदियाळी
बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर --गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने कॉँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. उमेदवारी निवडीत राजकीय पक्षांच्या नेत्यांची कसरत होणार आहे.
गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाचे बाबासाहेब माळी विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे तानाजी पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, त्यांचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या मतदारसंघातील ताकद यांचा विचार करता कॉँग्रेसला भाजपचे तगडे आव्हान राहणार आहे. विद्यमान उपसरपंच तानाजी पाटील पत्नी रूपाली पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळवून पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज आहेत.
गडमुडशिंगी हे मतदारसंघातील प्रमुख व मोठे गाव आहे आणि सर्वसाधारण पुरुष यासाठी आरक्षित झाल्याने कॉँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांचा उमेदवार निवडीत कस लागणार आहे. पंचायत समितीचे सदस्य सचिन पाटील यांनी पत्नी प्रियांका पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. सतेज पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते रावसाहेब पाटील यांनीही पत्नी तेजस्विनी पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घातले आहे. सांगवडेतून वंदना विजय पाटील, अश्विनी उत्तम शिंदे व कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून वैशाली आप्पासाहेब धनवडे इच्छुक आहेत, तर मतदारसंघातील काही नागरिकांच्या आग्रहामुळे ग्रा.पं. सदस्य विनोद सोनुले यांनीही पत्नी सुरेखा सोनुले यांना उमेदवारी मिळविण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. या सर्व मातब्बरांतून, समर्थकांतून एक उमेदवार निवडणे आ. सतेज पाटील यांची डोकेदुखी ठरणार आहे. बेरजेचे राजकारण पाहता ऐनवेळी जि. प.चे विद्यमान सदस्य बाबासाहेब माळी यांच्या पत्नीसही मैदानात उतरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपच्या उमेदवारीवर येथील निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे. भाजपकडून गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांच्या पत्नी रूपाली पाटील यांनाही उमेदवारी मिळू शकते. तसेच भाजपच्या करवीर तालुका महिला अध्यक्षा सुलोचना नार्वेकर (वळीवडे) यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. तसेच खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक राजगोंडा वळीवडे यांनी पत्नी अश्विनी वळीवडे यांच्या उमेदवारीसाठी स्वाभिमानी व भाजपकडे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी संघटनेकडून कै. बापूसाहेब चौगुले यांच्या स्नुषा वैशाली संजय चौगुले यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गडमुडशिंगी जि. प.साठी इच्छुक उमेदवार
अश्विनी राजगोंडा वळीवडे, वैशाली संजय चौगुले (स्वाभिमानी शेतकरी संघटना), तेजस्वीनी रावसाहेब पाटील, प्रियांका सचिन पाटील, सुरेखा विनोद सोनुले, अश्विनी उत्तम शिंदे, वंदना विजय पाटील - कॉँग्रेस, वैशाली आप्पासाहेब धनवडे (कॉँग्रेस व राष्ट्रवादी युतीकडून), सुलोचना नार्वेकर - भाजप, रूपाली तानाजी पाटील (अद्याप माहिती नाही)
गडमुडशिंगी पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार
आप्पासाहेब धनवडे - कॉँग्रेस-राष्ट्रवादी युती, प्रदीप प्रतापराव शिंदे, उत्तम बाबूराव पाटील, नितीन बाबूराव पाटील, हरिभाऊ साळोखे (कॉँग्रेस), पोपट पांडुरंग दांगट (शिवसेना), संजय येडेकर, सुदर्शन सर्जेराव पाटील (भाजप)
वसगडे पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार (ओबीसी महिला)
शोभा राजमाने (कॉँग्रेस) वसगडे, वीणा विष्णुपंत चौगुले (कॉँग्रेस) सांगवडे, योगिता तेजस बागडी (भाजप) वसगडे.
सन २०१२ ची निवडणूक
गडमुडशिंगी जिल्हा परिषद
बाबासाहेब माळी, कॉँग्रेस (८७४८) विजयी
तानाजी कृष्णात पाटील, राष्ट्रवादी (५३०५)
धनपाल शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना (४४८९)
गडमुडशिंगी पंचायत समिती
सचिन बाळासो पाटील, कॉँग्रेस (३५८८) विजयी
पोपट दांगट, शिवसेना (३४४६)
गोपाळ कांबळे, स्वाभिमानी (१५२१)
वसगडे पंचायत समिती
भुजगोंडा धुळगोंडा पाटील, कॉँग्रेस (५९८५) विजयी
रावसाहेब झोरे, स्वाभिमानी (४२६५)