भाजपच्या ‘सोशल मीडिया’ची ग्रामीण भागावर नजर
By Admin | Updated: July 25, 2014 22:15 IST2014-07-25T22:06:59+5:302014-07-25T22:15:37+5:30
कार्यशाळेत चर्चा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना करणार लक्ष्य

भाजपच्या ‘सोशल मीडिया’ची ग्रामीण भागावर नजर
सातारा : भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र सेल असलेल्या ‘सोशल मीडिया’ने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे. हे करत असताना नेमके काय करावे लागणार आहे, याची माहिती शुक्रवारी सातारा येथील कार्यशाळेत देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी ‘सोशल मीडिया सेल’चे प्रदेशाध्यक्ष जितेन गजारिया, सहसंयोजक मंदार घाटे, अनुप सूर्यवंशी, भाजपच्या शहराध्यक्षा सुवर्णादेवी पाटील, निखील झगडे, विजय काटवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत असताना ग्रामीण भागातील नेमक्या समस्या काय आहेत, महिला आणि युवक-युवती त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे नेमके प्रश्न काय आहेत, यावर भर देण्याची सूचनाही करण्यात आली. सोशल मीडिया सेलची सातारा जिल्ह्याची स्वतंत्र बेवसाईट निर्माण करण्याबरोबर प्रत्येक विधानसभा मतदार संघाची एक वार रूम राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रात भाजपचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाले. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रमुख मान्यवरांनी दिली.
सोशल मीडियाचा वापर करत असताना भाषाही जपून वापरण्याबरोबरच कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यशाळेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला व युवकांचीही यावेळी हजेरी होती. (प्रतिनिधी)