भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

By Admin | Updated: October 20, 2015 00:15 IST2015-10-19T23:58:32+5:302015-10-20T00:15:59+5:30

‘अमृत योजनेतून महापालिका सक्षम करणार : जाहीरनाम्यातील प्रत्येक गोेष्ट व्यवहारात आणणार : चंद्रकांतदादा पाटील

BJP's 'Shrimant Kolhapur' | भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

कोल्हापूर : महापालिकेचे केंद्र, राज्य व स्वनिधी या तीन स्तरांवर विकासाचे मॉडेल तयार केले असून, शहराचे प्रलंबित प्रश्न तत्परतेने प्रशासनासमोर मांडून ते निर्गत करणार आहे. आगामी पाच वर्षांत जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट व्यवहारात आणून ‘श्रीमंत कोल्हापूर’ करणारच; पण त्याबरोबर येथील सामान्य माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत करणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, शहरातील सोयी-सुविधांअभावी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकाला कोल्हापुरात दोन दिवस थांबावे असे वाटत नाही. यासाठी रंकाळा तलाव, पंचगंगा घाट, आदी पर्यटनस्थळे विकसित करावी लागणार आहेत. त्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मॉल उभे केले जाणार आहेत. तरुणांच्या हाताला काम द्यायचे झाल्यास येथील उद्योगधंदे अधिक सक्षम झाले पाहिजेत. उद्योगधंदे वाढण्यासाठी विमानसेवा हा महत्त्वाचा घटक असून, येत्या दोन महिन्यांत खासगी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. आगामी आठ-नऊ महिन्यांत विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी विमानेही येथे कशी येतील, त्यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तयार आहे, सत्तेवर आल्यानंतर वीज निर्मितीतील १/४ वीज महापालिकेला मिळणार आहे. त्यातून स्ट्रीट लाईटचे दोन कोटी वाचणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देता येईल, सौरऊर्जाचा वापर महापालिका इमारती, कार्यालयात केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यास ‘कोल्हापूर श्रीमंत’ होण्यास वेळ लागणार नाही. केंद्र व राज्यात सरकार आहे, त्याच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. वाय-फाय शहराबाबत एका कंपनीशी चर्चाही झाली आहे. आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेली आश्वासने ही कागदावर राहणार नाहीत. ती पूर्णत्वास नेण्यासाठी वचनबद्ध आहे. उपनगरांत दोनशे कॉटच्या हॉस्पिटलचा प्लॅन तयार आहे. आम्ही केवळ हवेतील बोलत नाही, त्याच्यासाठी कोणत्या ट्रस्टला जबाबदारी द्यायची यासह प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ आचारसंहिता असल्याने काही घोषणा करता येत नसल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत संबंधित गावांना विश्वासात घेऊन प्रबोधनातून विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, सुनील कदम, सत्यजित कदम, भगवान काटे, उत्तम कांबळे, सुहास लटोरे, सुनील मोदी उपस्थित होते.


विरोधकांच्या
बुद्धीची कीव
पालकमंत्री प्रचारात उतरणार नाहीत, अशी टूमही उठविली आहे; पण दिवसाला तीस कॉलनीमध्ये आपण प्रचार फेऱ्या पूर्ण करीत आहे. ‘स्मार्ट सिटी’ची निवड पारदर्शक झाली आहे. वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी निकषांत बसण्यासाठी ज्या गोष्टी करणे अपेक्षित होते ते केले नाही. त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात आहे. ‘स्मार्ट सिटी’बाबत विरोधकांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.


हे करणार
‘स्मार्ट सिटी’त सहभागासाठी प्रयत्न
केंद्राच्या ‘अमृत’ योजनेतून मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक वर्षी एक हजार कोटी
रंकाळा, पंचगंगा घाटासह पर्यटन विकसित करणे
मेडिकल टुरिझम विकसित करणे
‘झोपडपट्टी मुक्त शहर’ व ‘गार्डन शहर’ म्हणून ओळख करणार
स्वच्छ व मुबलक पाणी
विविध जागांचा गरजेनुसार ‘बीओटी’वर
विकसित करणार
शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी
‘मास्टर प्लॅन’ तयार
कचऱ्यापासून वीज निर्मिती
सांडपाण्याचा पुनर्वापर

Web Title: BJP's 'Shrimant Kolhapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.