सहकाराचे उच्चाटन हाच भाजपचा कार्यक्रम
By Admin | Updated: August 18, 2015 22:11 IST2015-08-18T22:11:38+5:302015-08-18T22:11:38+5:30
भाई जगताप यांचा आरोप : मुरगूड येथे विश्वनाथराव पाटील स्मृतिदिन

सहकाराचे उच्चाटन हाच भाजपचा कार्यक्रम
मुरगूड : सत्तेवर आलेल्या सरकारने सहकार समजून घेतलाच नाही. सहकार क्षेत्रावर काँग्रेसची घट्ट पकड आहे. त्यामुळेच या अधिवेशनामध्ये सहकाराचे उच्चाटन कसे करता येईल, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सहकार आणि काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा एक कलमी कार्यक्रमच त्यांनी हातात घेतला आहे; पण सहकाराकडे सत्ताधिशांनो वाकडी नजर केलात, तर शेतकरीच तुम्हाला शेतात गाडेल, असा सज्जड दम कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे सहकार महर्षी विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्यावतीने आयोजित ‘सहकार आणि आजचे सरकार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. यावेळी माजी आम. बजरंग देसाई, माजी आम. नामदेवराव भाईटे, दादा जगताप, रणजितसिंह पाटील, प्रविणसिंह पाटील, नगराध्यक्षा वसुधा कुंभार उपस्थित होते. दलितमित्र डी. डी. चौगले यांनी प्रास्ताविक केले.माजी आम. बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव शिंदे, नावेद मुश्रीफ, श्रीपती पाटील, विश्वास चौगले, साताप्पा पाटील, संतोष वंडकर, विजय शेट्टी, एम. डी. रावण, मारुती कांबळे, धनंजय मिसाळ, संजय हावळ उपस्थित होते. (वार्ताहर)
‘भाजप’ची क्रॉप्टनीती--सहकार क्षेत्रावर यांची पकड नसल्याने विविध संस्थांमध्ये घुसण्याची नवीन पद्धत या सरकारने अवलंबली आहे. मोठमोठ्या संस्थेत यांचे प्रतिनिधी आता क्रॉप्ट करून घुसत आहेत; पण चांगल्या संस्थांमध्ये मिठाचा खडा टाकून सहकारामध्ये बाधा येईल, असेही जगताप यांनी सांगितले.
सहकारमंत्र्यांमुळेच साखरेचा दर उतरला
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होत असताना सहकारमंत्र्यांनी बाहेरून चाळीस हजार टन साखर आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच साखर दरात कमालीची घसरण झाली. सूडभावनेने जर हे सरकार वागल,े तर सहकार उद्ध्वस्त होईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.