‘स्वाभिमानी’ला भाजपच्या नऊ जागा
By Admin | Updated: September 3, 2014 00:40 IST2014-09-03T00:40:25+5:302014-09-03T00:40:25+5:30
शिक्कामोर्तब : शिवसेनेच्या कोट्यातील जागांबाबत सकारात्मक चर्चा

‘स्वाभिमानी’ला भाजपच्या नऊ जागा
कोल्हापूर / मुंबई : महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील नऊ जागा देण्याचा निर्णय आज, मंगळवारी मुंबईत झालेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झाला. त्या जागांवर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती झाली असून, मतदारसंघांच्या नावांचा बंद लखोटा खासदार राजू शेट्टी व भाजपच्या नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ला दिली.
शिवेसेनेबरोबर त्यांच्या कोट्यातील ११ जागांची स्वाभिमानीने मागणी केली असून, त्याचीही सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे खोत यांनी सांगितले. जागा वाटपावरून मुख्यत: शिवसेना व भाजपशी अन्य घटक पक्षांचा निर्माण झालेला तणाव निवळला असून, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेला महायुती एकसंधपणे सामोरी जाईल, असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केला.
आज भाजपच्या कार्यालयात दुपारी ही बैठक झाली. त्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, प्रवक्ते माधव भंडारी, आदी उपस्थित होते. त्यामध्ये भाजपबरोबरच्या जागांचा गुंता सोडविण्यात आला. स्वाभिमानीने कोणते मतदारसंघ लढवायचे याची यादी तयार करून ती लखोट्यात बंद करण्यात आली. जेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष आठवले गट व शिवसंग्राम पक्षाबरोबरची जागा वाटप अंतिम होईल त्यावेळी ‘मातोश्री’वरून त्याची घोषणा केली जाणार आहे. ८ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आहे. शिवसेनेचे नेते त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे हा उत्सव झाल्यानंतर साधारणत: १२ सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मातोश्रीवर जाऊन खोत यांनी भेट घेतली. यावेळी संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते. शिवसेनेचे घटक पक्षांबरोबर जागा वाटपावरून वाद सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातून लोकांत संभ्रम तयार होत असल्याने सगळ््या घटक पक्षांशी शिवसेनेने चर्चा सुरू करावी, अशी चर्चा झाली. त्यानुसार शिवसेना स्वाभिमानीला ११ जागा देण्यावर राजी झाली आहे. त्यातील एक-दोन जागांत अदलाबदल होऊ शकेल. खासदार शेट्टी व ठाकरे यांच्या चर्चेतून हा बदल होईल. तत्पूर्वी स्वाभिमानी संघटना शिवसेनेने दिलेल्या ११ जागांबाबत पक्षांतर्गत चर्चा करणार आहे.
रिपब्लिकन पक्ष नाराज
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर महायुतीमधील या पक्षाचे संपूर्ण समाधान झाले. मात्र त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते जागावाटपाबाबत असमाधानी असून त्या पक्षाने बुधवारी पत्रकार परिषद बोलावून आपली नाराजी प्रकट करण्याचा इशारा दिला आहे.