भाजपचा कोल्हापूरात आनंदोत्सव, महिलांनी धरला फुगडीचा फेर
By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2023 20:31 IST2023-12-03T20:31:41+5:302023-12-03T20:31:57+5:30
यावेळी मान्यवरांच्या हस्ते येणाऱ्याजाणाऱ्यांना लाडू खायला घालण्यात आले.

भाजपचा कोल्हापूरात आनंदोत्सव, महिलांनी धरला फुगडीचा फेर
कोल्हापूर : चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंदोत्सव कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेर धरला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते येणाऱ्याजाणाऱ्यांना लाडू खायला घालण्यात आले.
तीन राज्यात विजय मिळाल्याचे वृत्त समजताच कार्यकर्ते सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. २०२४ चा विजयाचा गुलाल याच चौकामध्ये मोठ्या उत्साहात उधळण्यासाठी सर्वांनी शपथ घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी तिन्ही राज्यातील जनतेचे आभार मानले. प्रदेश सचिव महेश जाधव देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असे सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आणि माेदींच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख सत्यजित कदम, हेमंत आराध्ये, संतोष लाड, शैलेश पाटील, उमा इंगळे, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, विजयसिंह खाडे पाटील, किरण नकाते यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.