राष्ट्रवादीचा मोर्चा भाजप अडविणार
By Admin | Updated: June 3, 2015 01:05 IST2015-06-03T00:19:31+5:302015-06-03T01:05:44+5:30
भाजप बैठकीत कार्यकर्ते आक्रमक : पालकमंत्र्यांच्या घरावरील मोर्चावरून वाद चिघळण्याची चिन्हे

राष्ट्रवादीचा मोर्चा भाजप अडविणार
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगरातील निवासस्थानावर राष्ट्रवादी पक्षातर्फे शनिवारी (दि. ६) आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारा मोर्चा अडविण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने बैठकीत घेतला आहे. हा मोर्चा पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत कुठल्याही परिस्थितीत येऊ न देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील राहत असलेल्या प्रभागामधील भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी (दि. १) स्थानिक नागरिकांना घेऊन पोलीसप्रमुखांना निवेदन दिले. हे निवेदन केवळ तेथील नागरिकांच्या गैरसोयीबद्दलचे होते. या मोर्चासंदर्भात पक्षाची मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीतील माहिती भाजपने निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. यात म्हटले आहे, ‘ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नास्तव हा मोर्चा राष्ट्रवादी पक्षाने काढण्याचे निश्चित केले आहे, त्या शेतकऱ्यांचा कळवळा गेली १५ वर्षे सत्तेत असताना राष्ट्रवादी पक्षाला आणि मुश्रीफांना का आला नाही? शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत या राष्ट्रवादीची सत्ता असतानाच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे आणि मोठमोठे बॅनर्स कोल्हापूरभर झळकले, त्यावरील थकितांची नावे व आकडे पाहून समस्त कोल्हापूरकर आणि शेतकरी थक्क होऊन गेले, अशांनी ‘सौ चुहे खाके...’ या अविर्भावात शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा दाखवू नये. जिल्हा बँक लुटणाऱ्यांना पाटील यांच्यावर चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सरकार ठोस उपाययोजना योजत असताना आणि सत्तेवर येऊन केवळ चार ते पाच महिन्यांचा कालावधी झाला असताना सरकारकडून जादूच्या कांडीची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? याउलट अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत दादांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी धडाधड निर्णय घेत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रश्न धसास लावण्याच्या मार्गावर असतानाच केवळ राजकारण म्हणून दादांच्या घरावर मोर्चा काढणे हे निश्चितच निषेधार्थ आहे.
या राष्ट्रवादीला सत्तेवर असताना कोल्हापूर जिल्ह्याशी निगडित कुठलेच प्रश्न सोडवता आलेले नाहीत. याउलट केवळ चार महिन्यांमध्ये सर्किट बेंच, क्रीडासंकुल, अंबाबाईचा वज्रलेप, रंकाळा प्रदूषण, पंचगंगा स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधींचा निधी, टोलच्या प्रश्नावर यशस्वी सुवर्णमध्य, जुलैअखेर होत असलेल्या विमान सेवेच्या प्रश्नासाठी आणलेली गती, याबद्दल कधी मुश्रीफ यांनी तोंड उघडले आहे का?
या मोर्चासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये बाबा देसाई, अशोक देसाई, विजय जाधव, राहुल चिकोडे यांनी तीव्र भावना व्यक्त करत हा मोर्चा दादांच्या घरापर्यंत पोहोचू दिला जाणार नाही, असे ठणकावले. बैठकीमध्ये नाथाजी पाटील, आर. डी. पाटील, राजेंद्र देशमुख, संदीप देसाई, संतोष भिवटे, गणेश देसाई, किरण कुलकर्णी, संजय ढाले, ज्ञानदेव पुंगावकर, शिवाजी बुवा, भारती जोशी, मधुमती पावनगडकर, संभाजी पाटील, किशोरी स्वामी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्यांना महापौरही जुमानत नाहीत...त्यांनी...
कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी.मधील उद्योजक कोणाच्या दहशतीमुळे परराज्यात पळून गेले? स्वत:ला श्रावणबाळ समजणाऱ्यांची सत्तेशिवाय झालेली घालमेल त्यांच्या बेजबाबदार आणि बेताल वक्तव्यांवरून दिसून येते. बऱ्याच वर्षांची सत्ता आणि मंत्रिपद गेल्यामुळे वैफल्यग्रस्त मुश्रीफांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे. ज्यांच्या पक्षाची महिला महापौर त्यांनाच ठेंगा दाखवते व शब्दश: जुमानत नाही, त्यांनी भारतीय जनता पक्षाला उपदेशाचे डोस पाजू नयेत.