‘भाजप-ताराराणी’ची कागल-मुरगूडला एन्ट्री?
By Admin | Updated: July 7, 2016 00:40 IST2016-07-07T00:28:34+5:302016-07-07T00:40:16+5:30
दादांना फुलवायचेय ‘कमळ’ : महादेवराव महाडिक यांच्याकडूनही संपर्क

‘भाजप-ताराराणी’ची कागल-मुरगूडला एन्ट्री?
कागल : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी कागल तालुक्यात जोरदार आघाडी उघडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कागल आणि मुरगूड शहरातील काही कार्यकत्याबरोबर थेट संपर्क साधून प्राथमिक चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत आहे.
कागल-मुरगूडमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या माध्यमातून पॅनेलचीही जुळवाजुळव सुरू केली आहे. या दोन्ही शहरात मंत्री ‘चंद्रकांतदादांना कमळ’ फुलवायचे आहे आणि आमदार मुश्रीफांना ‘शह’ द्यायचा आहे. तर महादेवराव महाडिक यांना आ. सतेज पाटील यांना पाठबळ दिलेल्यांचे ‘उठ्ठे’ काढायचे आहे. या अंजेड्यातून कागल-मुरगूडमध्ये भाजप-ताराराणी आघाडी उतरत आहे.
कागल शहरात आ. मुश्रीफ आणि समरजजितसंह घाटगे एकत्र लढणार की स्वतंत्र ताकद अजमाविणार याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत. मंत्री चंद्रकांतदादांनी समरजितसिंह घाटगे यांनी स्वतंत्र आघाडी करावी, त्यास भाजप पाठिंबा देईल, अशी भूमिका मांडली आहे. तर महादेवराव महाडिक यांना आपले नातेवाईक असणारे अखिलेशराजे घाटगे (कागल ज्युनियर) यांना पुढे करून ताराराणी आघाडी करावयाची आहे.
या आघाडीत पाटील यांना पाठबळ देणाऱ्या मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे आघाडीला ‘शह’ देण्याचा त्यांचा इरादा आहे. या भाजप-ताराराणी आघाडीच्या मोर्चेबांधणीची कुणकुण लागल्याने आ. मुश्रीफांनीही मंडलिक गटालाही सोबत घेत कागलमध्ये भक्कम आघाडी करता येईल का? याची चाचपणी सुरू केली आहे. मुरगूडमध्ये रणजितसिंह पाटील हे महाडिक समर्थकच आहेत. मात्र, नगरपालिकेत आ. मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करतात. येथे मंडलिक गटाची भूमिका महत्त्वाची असल्याने या गटाला पुढे करून पाटील-मुश्रीफ गटाला शह देण्यासाठी काय करता येईल, याबद्दल ‘बिद्री’चे संचालक राजेखान जमादार यांच्याकडून मंत्री चंद्रकांतदादांनी काही ‘टिप्स’ घेतल्याचे समजते. त्यातून तेथे भाजपप्रणीत आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू
आहेत. मुरगूडकर पाटील बंधू आणि मंडलिक गटातील राजकीय ईर्षेमुळे महादेवराव महाडिक यांना राजकीय व्यूहरचना करताना कसरत करावी लागत आहे. तर मंत्री पाटील यांनी या
दोन नगरपालिकांत ‘कमळ’ फुलवायचे याच एका अजेंड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
‘कमळ’ चिन्हावरचा नगराध्यक्ष हवा
कागल तालुक्यातील या दोन्ही नगरपालिकांचे प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी काम सुरू केले आहे. सर्वच नेते मंडळीही कसे आणि कोणासोबत, कोणाविरूद्ध लढायचे? याचा अंदाज घेत आहेत.
जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना वेग आला असून, भाजप नेतृत्वाला तर या दोन्ही पाटीलांपैकी एका तरी ठिकाणी कमळ चिन्हावरचा नगराध्यक्ष हवा आहे. केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सत्तेचा लाभ आणि वलयाचा फायदा त्यांनी गृहीत धरला आहे.
मुरगूडमधील गट-तट
मुरगूडकर पाटील बंधू-आ. मुश्रीफांची युती येथे विद्यमान सत्ताधारी म्हणून आहे. मंत्री चंद्रकांतदादा यांना या युतीतून पाटील बंधूना बाहेर काढून तेथे भाजप प्रणीत नवी राजकीय मोट बांधायची आहे. त्यासाठी राजेखान जमादारांशी चर्चा केली आहे; पण येथे मंडलिक गटाची भूमिका महाडिक आणि मंत्री पाटील यांच्यासाठी अडथळ्याची ठरत आहे.