भाजप-ताराराणीचे महापालिकेसमोर बुधवारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:10+5:302021-09-26T04:26:10+5:30
कोल्हापूर : समाज माध्यमांवरील १८ टक्के कमिशनच्या मेसेजची आणि नागाळा पार्कातील नियमबाह्य चॅनेलच्या कामाची तक्रार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी ...

भाजप-ताराराणीचे महापालिकेसमोर बुधवारी आंदोलन
कोल्हापूर : समाज माध्यमांवरील १८ टक्के कमिशनच्या मेसेजची आणि नागाळा पार्कातील नियमबाह्य चॅनेलच्या कामाची तक्रार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. या दोन्ही कामात भ्रष्टाचाराचा संशय आहे; पण यातील दोषींवर प्रशासक कारवाई करीत नसल्याने बुधवारी (दि. २९) महापालिकेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, गेल्या महिन्यात महापालिका ठेकेदारांच्या वॉट्सॲप ग्रुपवरून सत्ताधारी राजकीय पक्षाने विकासकामांसाठी आणलेल्या निधीतून ज्या ठेकेदारांना कामे मिळाली आहेत, त्यांनी काम घेताना जे ठरले ते दोन दिवसांत पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. यावर एकाने पुन्हा १८ टक्के का ? असा सवाल केला होता. सुमारे १३ कोटींच्या विकास निधीत १८ टक्के म्हणजे अंदाजे सव्वादोन कोटी रुपये इतकी रक्कम कमिशन म्हणून कोणाला तरी देण्याचे ठरल्यासारखे भासत होते. म्हणून याचा तपास करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली; पण याची चौकशी झाली नाही.
नागाळा पार्कातील १२ नंबर प्रभागातील ३० लाख अंदाजपत्रकीय खर्चाच्या विकासकामाची सुरुवात केली होती. त्याची माहिती घेतल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना, कुठल्याही प्रकारचा कार्यारंभ आदेश नसताना ते काम सुरू केल्याचे समोर आले. २२ सप्टेंबरला आम्ही प्रशासकांना भेटून हे काम ज्यांनी सुरू केले आणि काम चालू करण्यास ज्यांनी सांगितले, त्यांच्यावर महापालिकेतर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याकडेही प्रशासकांनी दुर्लक्ष केले आहे. यावेळी विजयसिंह खाडे, चंद्रकांत घाटगे उपस्थित होते.