राष्ट्रवादीची मदत भाजपलाच

By Admin | Updated: October 20, 2014 00:41 IST2014-10-19T23:39:10+5:302014-10-20T00:41:07+5:30

विश्वजित कदम : चार मतदारसंघात ‘सेटलमेंट’चा आरोप

The BJP is the only NCP's help | राष्ट्रवादीची मदत भाजपलाच

राष्ट्रवादीची मदत भाजपलाच

सांगली : सांगली जिल्ह्यासह राज्यातील निकाल हे कॉँग्रेसच्या दृष्टीने निराशाजनक लागले आहेत. जिल्ह्यातील पलूस-कडेगाव, जत, सांगली आणि मिरज या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांची सेटलमेंट असल्यामुळेच राष्ट्रवादीने भाजपला उघडपणे मदत केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज (रविवारी) सांगलीत पत्रकार परिषदेत केला.
विधानसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने राज्यात सरकार बनविण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, हे कशाचे लक्षण आहे, असा प्रश्न उपस्थित करुन विश्वजित कदम म्हणाले की, यामुळे राष्ट्रवादीच्या विचारधारेवर शंका निर्माण झाली आहे. पाठिंबा देण्यामागे केवळ त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, हाच हेतू असण्याची शक्यता आहे. वास्तविक कॉँग्रेसने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले होते. परंतु आम्ही लोकांशी सुसंवाद साधण्यास कमी पडलो. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांसह सर्वच कॉँग्रेस नेत्यांनी प्रथमपासूनच आक्रमकपणे भाषणे करायला हवी होती. हे झाले नाही. याउलट भाजपने लोकसभेप्रमाणेच मार्केटिंग तंत्राचा प्रभावीपणे वापर केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांमुळेच भाजपला राज्यात यश मिळाले आहे. भाजपचे यश केवळ मोदी यांचेच आहे.
ते म्हणाले की, या निकालामुळे अद्यापही मोदींचा शहरी आणि ग्रामीण मतदारांवर प्रभाव होत असल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळात स्थानिक स्वराज संस्थांसह अन्य निवडणुका होत आहेत. त्यामध्ये मतविभागणी टाळायची असेल, तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघातील निकालावर मी निराश असून, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भाऊंचा पराभव धक्कादायक
सांगली मतदारसंघात मदनभाऊ पाटील यांचा झालेला पराभव हा धक्कादायक आहे. महापालिका कारभारावर त्यांचे योग्य नियंत्रण असायला हवे होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला केलेली मदत, एलबीटीचा प्रश्न, धनगर समाजाची विखुरलेली मते आणि प्रस्थापित सरकारविरोधात असलेली लाट याचा फटका त्यांना बसला असल्याचे दिसत आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

Web Title: The BJP is the only NCP's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.