महापौरांना भाजप सरकारचे पाठबळ का..?
By Admin | Updated: May 23, 2015 00:42 IST2015-05-23T00:40:56+5:302015-05-23T00:42:12+5:30
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विचारणा : कारवाईस सरकारकडून मुद्दाम विलंब

महापौरांना भाजप सरकारचे पाठबळ का..?
कोल्हापूर : लाच घेणाऱ्या मंत्रालयातील लिपिकास सापळा रचून पकडून देणारे मुख्यमंत्री कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांना का पाठीशी घालत आहेत, अशी विचारणा उपमहापौर मोहन गोंजारे, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने येथे असल्याने हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात म्हटले आहे, ‘महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारीस महासभेने मंजूर केलेल्या ठरावावर सही करण्याकरिता लाच स्वीकारण्याच्या तक्रारीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महापौर कार्यालयातच पकडले. नैतिकतेचा विचार करून महापौर राजीनामा द्यायला तयार नाहीत. उलट ज्या पक्षाने, नेत्याने, नगरसेवकांनी त्यांची बिनविरोध निवड केली, त्यांच्यावरच त्या उलटे आरोप करून बिनदिक्कतपणे कामकाज करत आहेत. त्यामुळे महापालिका सभागृह व जनतेचाही अपमान होत आहे. विद्यमान सभागृहाने १८ मार्चला महासभेमध्ये महापौरांविरोधात मुंबई महापालिका अधिनियमांनुसार कलम १०(१-१) व ‘कलम १३’ अन्वये अशोभनीय कृत्याबद्दल त्यांचे नगरसेवकपद व या कृत्यात महापौर दोषी आढळत असल्यास महापौर पदावरूनही त्यांना पदच्युत करण्याची कारवाई करावी, असे दोन ठराव ७२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करून पाठविले आहेत. या ठरावावर भाजपच्या सरकारने कारवाई का करण्यात येऊ नये, असा लेखी खुलासा महापौरांकडे मागितला आहे. याबाबत मुख्यमंत्री व कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहेत. तरीही ज्या तत्परतेने त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, त्या प्रमाणात ती होत नाही.
मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून दाखवावी
एकेकाळी मुख्यमंत्री फडणवीस लाच घेणाऱ्यांना पकडून देतात व आपण लाचखोर प्रवृत्तीविरोधात असल्याचे दाखवितात. मग महापौरांना सापळा रचून पोलिसांनीच पकडले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात कागदी घोडे नाचवून दिरंगाई केली जात आहे. यामागे राजकारण आहे हे कोल्हापूरची जनता ओळखून आहे. येत्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसविरोधी प्रचारात या प्रकरणाचा उपयोग करता यावा, यासाठीच भाजप-शिवसेना सरकार कारवाईस उशीर करत आहे, असा आमचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी महापौरांवर कारवाई करून आपण बोलतो तसेच करतो हे दाखवून द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.