भाजप सरकार सीमाबांधवांच्या पाठीशी
By Admin | Updated: May 23, 2015 00:27 IST2015-05-22T23:43:27+5:302015-05-23T00:27:05+5:30
सीमा प्रश्न : कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांची कोणतीही भूमिका असो : तावडे

भाजप सरकार सीमाबांधवांच्या पाठीशी
कोल्हापूर : सीमाप्रश्नी कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांनी कोणतीही भूमिका घेतली, तरी राज्यातील भाजप सरकार मात्र मराठी सीमाबांधवांच्या पाठीशी ठाम राहील, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रवक्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक शुक्रवारी सायंकाळपासून येथे सुरू झाली. तत्पूर्वी, या बैठकीची माहिती देण्यासाठी तावडे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास राज्य सरकारकडून विलंब होत असल्याकडे लक्ष वेधले असता तावडे म्हणाले की, कॉँग्रेस सरकारच्या काळात शिवराज पाटील गृहमंत्री असल्यापासून हा विषय न्यायालयात आहे. आम्ही कोणताही विलंब करीत नाही. आमची सीमाप्रश्नाबाबतची भूमिका स्पष्टच आहे. यापूर्वीही ती जाहीर केली होती. कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने तसेच कार्यकर्त्यांनी कोणतीही भूमिका घेतली असली तरी महाराष्ट्रातील भाजप व राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील, असे तावडे म्हणाले. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तपास रेंगाळला आहे, याबाबत छेडले असता तावडे यांनी हा विषय संवेदनशील असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी तपासासंदर्भात बोलून माहिती घेणार आहेत. ते काही सूचना देतील, असे त्यांनी सांगितले. जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका विरोधाची असली तरी भाजप-शिवसेनेत चर्चा होऊन निर्णय होईल, अशी तावडे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून ३५२ कोटींचा निधी मिळाला असून, राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांना तो देण्यात येईल. कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालयाला जादा वाटा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावास ना हरकत मिळाली आहे. मंत्रिमंडळात प्रस्ताव करण्यापर्यंत प्रक्रिया पोहोचली आहे. याबाबत केव्हाही निर्णय होईल, असे तावडे यांनी सांगितले.
चव्हाण यांना विरोधी पक्षाची भूमिका जमतेय
राज्यात भाजप सरकार निर्णय घेत नाही, या कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता तावडे म्हणाले, कॉँग्रेसने गेल्या ५६ वर्षांत केले नाही, ते भाजपने १२ महिन्यांत करावे, अशी चव्हाण यांची अपेक्षा आहे. नकारात्मक दृष्टीने पाहिले तर तसेच दिसणारे. माझ्या मते, चव्हाण यांना आता विरोधी पक्षाची भूमिका जमायला लागली आहे.