‘टाकाळा खणी’मध्ये भाजपसमोर गड राखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:10 IST2021-01-24T04:10:55+5:302021-01-24T04:10:55+5:30
विनोद सावंत लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : झोपडपट्टी, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्ती असा संमिश्र परिसर असणारा प्रभाग क्रमांक ३८ ...

‘टाकाळा खणी’मध्ये भाजपसमोर गड राखण्याचे आव्हान
विनोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : झोपडपट्टी, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्ती असा संमिश्र परिसर असणारा प्रभाग क्रमांक ३८ टाकाळा खण, माळी कॉलनी हा आहे. या प्रभागात महापालिकेची गत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भाजपच्या सविता भालकर ५१ मतांनी विजयी झाल्या. यंदाच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. सध्या इच्छुकांची संख्या कमी असली, तरी मातब्बर उमेदवार रिंगणात असून, येथून महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
गत निवडणुकीमध्ये हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असताना तब्बल दहा उमेदवार रिंगणात होते. असे असले, तरी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. माजी नगरसेवक दिवंगत गजानन भालकर यांच्या स्नुषा सविता शशिकांत भालकर (भाजप) यांनी बाजी मारली. त्यांनी माजी नगरसेवक अनिल कदम यांच्या पत्नी अश्विनी अनिल कदम (राष्ट्रवादी) यांचा ५१ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्या मातोश्री सरोजिनी देवकुळे यांना ४३४ मते मिळाली. ज्योती प्रकाश चौगुले यांनाही ३५९ मते मिळाली.
माजी नगरसेवक दिवंगत गजानन भालकर यांनी महापालिकेमध्ये तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. गत निवडणुकीत त्यांच्या स्नुषा सविता भालकर यांनी या प्रभागातून प्रतिनिधीत्व केले. यंदा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग झाला असून, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक जो निर्णय घेतील त्यानुसार भालकर कुटुंबाची पुढील दिशा ठरणार आहे. सविता भालकर यांचे पती शशिकांत भालकर किंवा दीर अमर भालकर यांच्यापैकी एक निवडणूक रिंगणात असणार आहे.
माजी नगरसेवक अनिल कदम यांनी महापालिकेत १९९५ मध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. क्रीडा सभापती असताना त्यांनी बंद झालेला महापौर चषक पुन्हा सुरू केला. ते ३५ वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. राजारामपुरीत पुढाकार घेऊन लोकसहभागातून स्केटिंग ग्राऊंड, स्विमिंग टँक आणि उद्यान विकसित केले. गत निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी कदम यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी सामाजिक काम सुरू ठेवले असून, या निवडणुकीत ते स्वत: रिंगणात उतरले आहेत.
विशाल देवकुळे यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरात साडेतीन लाखांची पिण्याची पाईपलाईन टाकली आहे. माळी कॉलनीत दोन ठिकाणी रस्ते केले. टाकाळा खणीत कचरा टाकत असल्यावरून झालेल्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. प्रभागातील नागरिकांना रमाई आवास योजनेतून घरे देण्यासाठी पाठपुरावा केला. गोरगरिबांना अल्पदरात आरोग्य सुविधा देण्यासाठी ते नेहमी धडपडत असतात. कोरोना काळातही त्यांनी मदतकार्य केले. टाकाळा खण ऑक्सिजन पार्क करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. यंदाची निवडणूक त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला असून, लहान भावाची पत्नी प्रतिभा अनुप देवकुळे यांना रिंगणात उतरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी नगरसेवक प्रकाश चौगुलेही जोमाने निवडणुकीत उतरले असून, प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच योगेश हतलगे यांच्या नावाचीही चर्चा आहे. ऐनवेळी आणखी काहीजण उमेदवारी घोषित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिक्रिया
विरोधी आघाडीत असतानाही महापालिका फंडासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून प्रभागात सुमारे ५ कोटींची विकासकामे केली. झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डसाठी प्रयत्न केले असून, काम अंतिम टप्प्यात आहे. टाकाळा खण जलस्त्रोत परिसर सुशोभिकरणासाठी १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर केला आहे. पुढील काळात या परिसरात इराणी खणीच्या धर्तीवर सुशोभिकरण करुन विद्युत रोषणाई आणि कारंजा सुरू करणे, प्रभागातील उर्वरित गटारी, रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा मानस आहे.
सविता भालकर, विद्यमान नगरसेविका
चौकट
सविता शशिकांत भालकर (भाजप) १४४२
अश्विनी अनिल कदम (राष्ट्रवादी) १३९२
सरोजिनी श्रीपाल देवकुळे (शिवसेना) ४३४
ज्योती प्रकाश चौगुले (काँग्रेस) ३५९
पद्मजा बाळासाहेब पांडव (अपक्ष) २६४
चौकट
पाच वर्षांत केलेली विकासकामे
टेंबलाई नाका येथे हायमास्ट दिवे
टेंबलाई नाका ते दिघे हॉस्पिटल ड्रेनेजलाईन
दिघे हॉस्पिटल ते स्मृतिबन बाग ड्रेनेज लाईन
टाकाळा विद्यामंदिरमध्ये स्क्रीन, प्रिंटर, ई-लर्निंग सुविधा
५५० घरांमध्ये शौचालय, ४०० घरात गॅस कनेक्शन
संपूर्ण प्रभागात एलईडी
माळी कॉलनीत ओपन स्पेसमध्ये ३० लाखांच्या निधीतून विरंगुळा केंद्र
आशा कॉलनी येथील ४३ घरांना प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान
चौकट
शिल्लक असलेली विकासकामे
टेंबलाई नाका ते दिघे हॉस्पिटल रस्ता खराब
शिवसुमन ते राजू पठाण यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
रामकृष्ण हॉटेल ते पूर्वा हॉस्पिटल रस्ता खराब
टाकाळा खणीत गाळाचे साम्राज्य, परिसरात डासांचा त्रास
प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न १०० टक्के मार्गी लागणे आवश्यक
श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी परिसरात जुन्या ड्रेनेजलाईन, पाईपलाईनमुळे समस्या
फोटो : २२०१२०२१ कोल केएमसी टाकाळा खण प्रभाग न्यूज
ओळी : कोल्हापुरातील टाकाळा खणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे केंदाळ वाढले असून परिसरात डासांचे साम्राज्य झाले आहे.