भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली : अरुण लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:24+5:302020-12-05T04:59:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. ...

भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली : अरुण लाड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. पदवीधरांसाठी काहीही न करता त्यांना प्रत्येकवेळी गृहीत धरल्यामुळेच मतदारांनी जातीयवादी शक्तीला त्यांची जागा दाखविली, अशी टीका पदवीधरचे नूतन आमदार अरुण लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच हा मोठा विजय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अरुण लाड म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फार काळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस घोषणांनाही जनता कंटाळल्याचे राज्यातील सर्वच जागांच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते होते. त्यांना मतदार आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने जागा दाखविली. कुणी काहीही म्हणोत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन मतदान करून घेतले. प्रत्येकाने विजय खेचून आणायचाच, या जिद्दीने काम केले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यालाही कामाला लावले. प्रचारात आणि मतदान नोंदणीपासून ते करून घेण्यापर्यंत चांगले नियोजन केले होते. म्हणूनच पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य घेऊन विजय मिळवून प्रस्थापित भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नियोजन असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन अटळ असेल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.
-----------------------------------
फारकाळ जनतेला फसविता येत नाही
अरुण लाड म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत बोगस घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या जाचक नियमांमुळे उद्योजक अडचणीत असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हमीभाव कागदावरच असून, तो शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. बेरोजगारी दिवसाला वाढत असून, भांडवलदार गलेलठ्ठ होत आहेत. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. जनतेला फसवून फार काळ सत्ता मिळविता येत नाही, असा संदेशच पदवीधरच्या निवडणुकीतून मतदारांनी दिला आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.