सा. रे. पाटलांच्या विचारांचा वारसा जपू
By Admin | Updated: April 3, 2015 23:56 IST2015-04-03T23:22:44+5:302015-04-03T23:56:22+5:30
राजेंद्र पाटील-यड्रावकर : जयसिंगपूरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा

सा. रे. पाटलांच्या विचारांचा वारसा जपू
जयसिंगपूर : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी कायम झुंजणारे नेते सा. रे. पाटील यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत तळागाळातील लोकांचे काम केले. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. त्यांच्या निधनाने तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासू, अशी भावना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केली. नगरपालिकेची नवीन इमारत बांधून ग्रंथालयाला स्व. सा. रे. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. येथील नगरपालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित शोभसभेत ते बोलत होते.
नगराध्यक्ष सुनीता खामकर म्हणाल्या, शिक्षण, सहकार, राजकारण क्षेत्रात सा. रे. पाटील हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढाकार घ्यावा. धाडसी व स्वावलंबी बनावे, यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले, अशा थोर नेत्यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.नगरपालिकेच्या माध्यमातून जयसिंगपुरात सा. रे. पाटील यांची स्मृती कायम राहावी यासाठी त्यांचे स्मारक उभारावे, अशी भावना माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केली. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींना उजाळा दिला.रघुनाथ देशिंगे, प्रसाद नाईक, भाजपचे राजेंद्र दार्इंगडे, नगरसेवक शिवाजी कुंभार, संगीता पाटील, रमेश यळगुडकर, विठ्ठल मोरे, दिलीप मगदूम, अर्जुन देशमुख, भूपाल विभूते, भगवंत जांभळे यांनी शोकसभेत भाग घेतला. यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष स्वाती पडूळकर, विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( प्रतिनिधी )