गांडूळ खतापासून बनविलेला केक कापून झाडांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:01+5:302021-06-18T04:17:01+5:30
मागील वर्षी जून महिन्यामध्ये २८ वर्षांपूर्वी दहावीत शिकणारे वर्ग मित्र स्नेहमेळाव्याच्या निमिताने एकत्र आले. त्यांनी शाळेसाठी काही तरी भेट ...

गांडूळ खतापासून बनविलेला केक कापून झाडांचा वाढदिवस
मागील वर्षी जून महिन्यामध्ये २८ वर्षांपूर्वी दहावीत शिकणारे वर्ग मित्र स्नेहमेळाव्याच्या निमिताने एकत्र आले. त्यांनी शाळेसाठी काही तरी भेट द्यावी या उद्देशाने नेहरू हायस्कूलच्या मैदानाभोवती पंचाहत्तरहून अधिक झाडे लावली. फक्त झाडे लावली नाही तर ती जगवली देखील. वर्षभरामध्ये लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी लाकडी ट्री गार्ड बसविले तसेच वेळच्यावेळी मशागत, भांगलण, खत, पाणीही घातले. जगलेल्या झाडांचा वाढदिवस शाळेच्या मैदानावर वर्गमित्रांनी एकत्र येऊन मोठ्या थाटात साजरा केला. गांडूळखतापासून तयार केलेला केक पंडित माने, गोरख तडुलकर यांच्या हस्ते कापण्यात आला. यावेळी रंगीबेरंगी फुग्यांची आरास व प्रत्येक झाडाच्या गार्डला फुगे लटकवून आकर्षक सजावट करण्यात आली होती. उपस्थितांच्या हस्ते खत घालून झाडांना केक भरविण्यात आला. जागृत समितीच्या वतीने खोरे व कुदळ तर महादेव पाटील यांनी गांडूळ खत भेट म्हणून दिले. यावेळी मुख्याध्यापक पी. एस. पोर्लेकर, पर्यवेक्षक निवृत्ती धांडोरे, श्रीहरी मेंगाणे, राजेंद्र लव्हटे, सागर वरपे, संदीप चौगुले, शानराव पाटील, सुनील यादव, संजय पाटील, एन. सी. पाटील, रणजित चौगले उपस्थित होते.
फोटो : कोतोली येथील नेहरू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गांडूळ खतापासून तयार केलेला केक कापून झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.