नृसिंहसरस्वती जन्मकाळ सोहळा

By Admin | Updated: December 24, 2014 00:21 IST2014-12-23T23:17:05+5:302014-12-24T00:21:45+5:30

धार्मिक विधी : नृसिंहवाडीत हजारो भाविकांची उपस्थिती

Birthday ceremony of Nrusinhasaraswati | नृसिंहसरस्वती जन्मकाळ सोहळा

नृसिंहसरस्वती जन्मकाळ सोहळा

नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
येथील श्री दत्त मंदिरात गेले सात दिवस सुरू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानेच्यावतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर’ पादुकांची स्थापना केली. त्यांच्या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असल्याने हा जन्मोत्सव सोहळा महत्त्वाचा मानला
जातो.
येथील दत्त मंदिरात आज, मंगळवारी पहाटे पाच वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा झाल्यावर श्री चरणांवर लघुरूद्राभिषेक करण्यात आला. उत्सवकाळात सुरू असलेल्या श्रीमद् गुरूचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात आली. सकाळी अकरा वाजता वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण व बारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘श्री गुरूदेव दत्त’च्या गजरात श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या ‘श्रीं’च्या चांदीच्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली. येथील ब्रम्हवृंदानी पाळणा म्हटला व प्रार्थना करण्यात आली. महिलांनी मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आला.
जन्मकाळ झाल्यानंतर श्रींच्या मनोहर पादुकांची महापुजा करण्यात आली. मानकरी रघूनाथ विश्वनाथा खोंबारेपुजारी व परिवार यांनी ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. सायंकाळी पाच वाजता पोखरण येथील हभप पुरूषोत्तम दत्तात्रय पोखरणकर यांचे किर्तन व रोत्री आठनंतर धुप, दिप, आरती व पालखी सोहळ्यानंतर शेजारती करण्यात आली. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कोकण, गोवा, कर्नाटक आदी प्रांतातून भाविक आले होते. उत्सवाचे दत्त देव संस्थानच्यावतीने नेटके संयोजन करण्यात आले होते.
(वार्ताहर)
फोटो -२३१२२०१४-जेएवाय-०१
फोटो ओळी -

Web Title: Birthday ceremony of Nrusinhasaraswati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.