पक्षीगणना पूर्ण, कोल्हापूरात १४२ प्रजातींच्या ४१८१ पक्ष्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:31+5:302021-02-05T07:08:31+5:30
संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ने आयोजित केलेल्या पक्षी गणनेमध्ये १४२ प्रजातींच्या ४१८१ पक्ष्यांची नोंद करण्यात ...

पक्षीगणना पूर्ण, कोल्हापूरात १४२ प्रजातींच्या ४१८१ पक्ष्यांची नोंद
संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ने आयोजित केलेल्या पक्षी गणनेमध्ये १४२ प्रजातींच्या ४१८१ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. तलावांमध्ये मिसळणारे सांडपाणी, काठावरून होणारा माणसांचा मोठा वावर, अवकाळी पावसामुळे वाढलेली पाण्याची पातळी, गाळ काढताना कमी झालेल्या पान वनस्पती यामुळे स्थलांतरित बदकांनी तलावांकडे पाठ फिरवल्याचा निष्कर्ष ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’च्या अभ्यासकांनी काढला आहे.
हवामान बदलाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी आणि कोल्हापूरातील सर्व पक्षीप्रेमींना एकत्र जोडण्यासाठी ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका तलावावर पक्षी गणना घेण्यात आली. यासाठी निसर्गतज्ज्ञ सुहास वायगंणकर, आशिष कांबळे, स्वप्नील पवार, फारूक म्हेतर, दिलीप पाटील आदींनी मार्गदर्शन केले.
कोल्हापूरात १४२ प्रजातींचे ४१८१ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. ३२ प्रजातींचे ६७१ स्थलांतरित पक्षी, ९ प्रजातींचे २९५ स्थानीक स्थलांतरीत पक्षी आणि आययूसीएनच्या संकटग्रस्त यादीमधील पैंटेड स्टोर्क, वुली नेकड् स्टोर्क, ब्लॅक हेडेड आयबिस, रिव्हर टर्न या प्रजातींचे पक्षी नोंदवले गेले.
या पक्षी गणनेसाठी प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी समन्वयक म्हणून काम केले. तसेच अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे या पक्षीप्रेमींनी याची कार्यपूर्ती केली.
नोंदवलेले स्थलांतरित पक्षी : ग्रीन विंगड् टिल, गार्गणी, नॉर्थरन शोवलेर, ब्लॅक इअरड् काइट, युरेशियन स्पॅरोहॉक, मार्श हॅरीयर, ऑस्प्रे, बैलोन्स क्रेक, कॉमन ग्रीनशांक, ग्रीन सॅन्डपायपर, वूड सॅन्डपायपर, कॉमन सॅन्डपायपर, कॉमन स्नाइप, टेमींकस् स्टिंट, युरेशियन रायणेक, बार्न स्वॉलो, ब्राउन श्राइक, एशी ड्रोंगो, रोजी स्टारलिंग, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, टायगा फ्लायकॅचर, क्लॅमोरोस वोब्लर, ब्लिथस् रीड वोब्लर, पॅडीफील्ड वोब्लर, बुटेड वोब्लर, सायबेरीयन स्टोनचॅट, ब्लिथस् पीपीट, ट्री पीपीट, येल्लोव वॅगटेल, व्हाईट वॅगटेल, कॉमन रोजफिंच
स्थलांतरित बदकांनी फिरवली तलावांकडे पाठ
कोल्हापूर शहरातील तलावांचा विकास हा माणसांसाठी न होता पर्यावरणाच्या दृष्टीने होण्याची गरज आहे. या हंगामातील पक्षी गणनेत स्थलांतरित बदकांनी कोल्हापूर शहरातील तलावांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
कोट
विविध कारणांमुळे स्थलांतरित बदकांसाठी पोषक असणारा उथळ तसेच दलदलीचा भाग तयार झालेला नाही. स्थलांतरित बदकांसाठी पाण्यामध्ये बेट तयार करणे, तलावाच्या काठांवरून माणसांचा वावर थांबविणे, तलावांमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबविणे. गाळ काढताना पान वनस्पतींचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे अशा उपाययोजनांची गरज आहे.
- सत्पाल गंगलमाले,
पक्षी अभ्यासक, काेल्हापूर.
(फोटो -०३०२२०२१-कोल-इंडियन व्हाईट आय)
(फोटो -०३०२२०२१-कोल-मार्श हॅरीयर)