काेल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:29+5:302020-12-09T04:19:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत ...

काेल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यवहार बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. शहरातील भाजीमंडईत दिवसभर शुकशुकाट होता. दूध संकलन जरी सुरळीत झाले असले तरी वाहतूक लवकर केल्याने संकलनात घट झाली आहे.
‘बंद’मुळे एरव्ही वाहतुकीची कोंडी असणाऱ्या शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसत होती. खासगी कार्यालये, दुकाने, बंद राहिल्याने महत्त्वाची कामे असणारेच घराबाहेर पडले होते. दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र त्याही बंद राहिल्या. शासकीय कार्यालयासह औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल आलाच नाही. त्यामुळे भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, गूळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. आवक-जावक थांबल्याने साडेचार कोटींची उलाढाल ठप्प झाली. दुधासह जीवनावश्यक वस्तूंना बंदमधून सवलत दिली होती. तरीही ‘गोकुळ’, ‘वारणा’सह इतर दूध संघांनी लवकर संकलन करून वाहने दूध संघात येण्यासाठी प्रयत्न केले. एरव्ही सात वाजता संकलन सुरू होणाऱ्या ठिकाणी साडेपाच वाजताच दूध घेतल्याने संकलन कमी झाले. ‘गोकुळ’चे सकाळच्या पाळीत ५० हजार लिटर, तर ‘वारणा’चे सुमारे पाच हजार लिटर संकलन घटल्याचे सांगण्यात आले. मेडिकल, पेट्रोल-डिझेलचे पंप सुरू असले तरी त्या ठिकाणची उलाढाल कमी झाली. एस. टी. व के. एम. टी.च्या काही बसेस सोडण्यात आल्या; मात्र प्रवासी नसल्याने गाड्या दिवसभर स्थानकातच लावून होत्या. त्यामुळे एस. टी. महामंडळ व के. एम. टी. प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या दिल्या घोेषणा :
‘जय जवान - जय किसान’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव’, ‘शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या केंद्राचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणते कायदा रद्द होत नाही, केल्याशिवाय राहत नाही.’
‘नांगर’ आणि काळ्या टोप्या
‘मावळा कोल्हापूर’ संघटनेचे पदाधिकारी ‘लाकडी नांगर’ घेऊनच बिंदू चौकात आल्याने तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे स्कार्फ गळ्यात घातले होते; तर काहींनी काळ्या टोप्या घालून केंद्र सरकारचा निषेध केला.
घोषणांनी बिंदू चौक दणाणला
शिवसेना व डाव्यांचे आंदोलन म्हणजे घोषणांचा अक्षरश: पाऊस असतो. त्यात कॉग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याने बिंदू चौक दणाणून गेला हाेता.
- राजाराम लाेंढे