दुचाकी आडवी घातली म्हणून पाठलाग करून चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:23+5:302021-08-20T04:30:23+5:30
कोल्हापूर : गर्दीत दुचाकी आडवी का घातलीस, या कारणास्तव एकाला शिवीगाळ करत पाठलाग करून चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवार पेठेतील ...

दुचाकी आडवी घातली म्हणून पाठलाग करून चाकूहल्ला
कोल्हापूर : गर्दीत दुचाकी आडवी का घातलीस, या कारणास्तव एकाला शिवीगाळ करत पाठलाग करून चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवार पेठेतील आझाद चौकात घडला. या चाकू हल्ल्यात सुनील सूर्यकांत पेनकर (वय ३६, रा. शाहू उद्यान, गंगावेश) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अनिकेत सावंत (रा. आझाद चौक, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील पेनकर हे आपल्या दुचाकीवरुन पत्नीला माहेरुन आणण्यासाठी राजारामपुरीत जात होते. आझाद चौकात वाहनांची गर्दी होती. गर्दीतच दत्त भिक्षालिंग मंदिरनजीक त्याच्या दुचाकीच्या आडवी अनिकेत सावंत याने आपली दुचाकी घातली. त्यावरून दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. वादातच अनिकेतने शिवीगाळ करत शेजारील केशकर्तनालयाच्या दुकानात जाऊन तेथील चाकू आणला. त्यावेळी सुनीलने दिलबहार तालीमच्या समोरील गल्लीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अनिकेतने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूहल्ला केला. पाठीत तीन वार झाल्याने सुनील गंभीर जखमी झाला. चाकूहल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने पोलिसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी सहायक फौजदार विजय कोळी तपास करत आहेत.