यंत्रमाग उद्योगाला महागाई निर्देशांकाचा दणका
By Admin | Updated: September 6, 2015 23:26 IST2015-09-06T23:26:46+5:302015-09-06T23:26:46+5:30
उद्योगाचे कंबरडे मोडण्याची भीती : पगारात वर्षाला २५०० रुपये वाढ शक्य

यंत्रमाग उद्योगाला महागाई निर्देशांकाचा दणका
राजाराम पाटील- इचलकरंजी शासनाने जाहीर केलेल्या यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाबरोबर या उद्योगास मुंबई महागाई निर्देशांक लागू केल्यामुळे प्रतिवर्षी सुमारे अडीच हजार रुपयांची वेतनवाढ द्यावी लागेल, अशी माहिती उजेडात येऊ लागली आहे. परिणामी, सुधारित किमान वेतनातील वाढीच्या बरोबरीने महागाई निर्देशांकही यंत्रमाग उद्योगाचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.
यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सन २०१३ मध्ये ड्राफ्ट नोटिफिकेशन जाहीर केले. त्यामध्ये सायझिंग, यंत्रमाग व प्रोसेसर्स कारखान्यातील कामगारांचा समावेश आहे. २० आॅक्टोबर २०१३ रोजी काढलेल्या ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये कामगारांसाठी सात हजार ९०० रुपये किमान वेतन असावे, असे शासनाने म्हटले. त्यावर १७ डिसेंबर २०१३ ला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनसह अन्य यंत्रमागधारक, तसेच कामगार संघटनांनी हरकती व सूचना दिल्या होत्या. त्यावेळी शासनाने मात्र कोणताही निर्णय घेतला नाही.
सप्टेंबर २०१४ मध्ये सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर करावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी सुरू असताना शासनाने यंत्रमाग कामगारांसाठी दहा हजार ५०० रुपये किमान वेतन जाहीर केले. शासनाने सात हजार ९०० रुपयांच्या किमान वेतनावर हरकती व सूचना मागविल्या आणि जाहीर करताना दहा हजार ५०० रुपयांचे किमान वेतन जाहीर केले. मात्र, हे किमान वेतन अव्यवहार्य व अन्यायी आहे. ते उत्पादनाशी निगडित असले पाहिजे, असे यंत्रमागधारक व सायझिंगधारकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. कारण इचलकरंजीइतके वेतन राज्यातील अन्य यंत्रमाग केंद्रातील कामगारांना मिळत नाही. तर सध्याच्या बाजारातील स्पर्धेत येथील कापड किमतीच्या तुलनेत टिकणार नाही आणि येथील वस्त्रोद्योग मोडकळीस येईल.
दरम्यान, इचलकरंजी हे यंत्रमाग केंद्र यापूर्वी सोलापूर औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने येथे महागाईचा निर्देशांक मुंबईच्या प्रमाणात स्वस्त होता. मात्र, आता इचलकरंजीसह सर्व यंत्रमाग केंद्रांचा मुंबई औद्योगिक क्षेत्रात समावेश केल्याने येथील महागाई निर्देशांकांची किंमत वाढली आहे.
यंत्रमाग कामगारांना महागाई निर्देशांकाच्या वाढीच्या प्रमाणात वेतनवाढ देताना ती दरवर्षी २५०० रुपयांनी वाढणार आहेत. ही वाढ उत्पादनाशी निगडित केली तर प्रत्येक मीटरला ३० पैसे मजुरीवाढ (म्हणजे ३० टक्के) होणार आहे. परिणामी, नवीन महागाई निर्देशांकामुळे येथील यंत्रमाग उद्योगाचे कंबरडेच मोडणार आहे.
...तर वर्षाला २६०० रुपये वाढ
यंत्रमाग कामगार सुमारे आठ ते दहा यंत्रमाग चालवितात. त्यांना सरासरी २२०० रुपये प्रत्येक आठवड्याला पगार पडतो. तर महिन्याला आठ हजार ८०० रुपये पगार पडतो. असे गृहीत धरले तर नवीन मुंबई महागाई निर्देशांकाप्रमाणे त्याच्या पगारामध्ये एक वर्षानंतर दोन हजार ६०० रुपयांची वाढ मिळेल. म्हणजे त्यांचा पगार वर्षानंतर अकरा हजार ४०० रुपये होईल. पगाराची इतकी वाढ कोणत्याच उद्योग धंद्यामध्ये नसल्यामुळे येथील उद्योजक धास्तावले आहेत.