जयसिंगपूर नगरपालिकेचे ‘बिग बजेट’ मंजूर
By Admin | Updated: February 27, 2015 00:20 IST2015-02-26T20:44:57+5:302015-02-27T00:20:52+5:30
करवाढ नसलेला अर्थसंकल्प : २०१५-१६ साठी ७८ कोटी ९४ लाख ४२ हजारांची तरतूद

जयसिंगपूर नगरपालिकेचे ‘बिग बजेट’ मंजूर
जयसिंगपूर : कोणतीही करवाढ न करता सन २०१४-१५ च्या सुधारित आणि सन २०१५-१६ च्या वित्तीय वर्षाच्या चार कोटी १९ लाख ८२ हजार ८१९ रूपये एवढ्या शिल्लकी अंदाजपत्रकास नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खामकर होत्या. पालिकेच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा बजेट मंजूर झाला आहे.
२०१४-१५ चा सुधारित अर्थसंकल्प व २०१५-१६ चा स्थायी समितीच्या मंजुरीने आलेल्या अर्थसंकल्पास मंजुरीसाठी गुरूवारी पालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात विशेष सभा झाली. विषय वाचन अनिल तराळ यांनी केले.
सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजूस ७८ कोटी ९४ लाख ४२ हजार ४१९ रुपये, तर खर्चाच्या बाजूस ७४ कोटी ७४ लाख ५९ हजार ६०० रुपये दाखविली आहे. अर्थसंकल्पात झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर, भुयारी गटर योजना, सीसीटीव्ही कॅमेरे, निर्मल शहरासाठी अनुदान, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण, एलईडी पथदिवे, अपंग, आर्थिक दुर्बल घटक व योग्य तरतुदी केल्या आहेत.
नगरसेवक शिवाजी कुंभार यांनी पालिका स्वयंभू होण्यासाठी प्रशासनाबरोबर नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षण विभागाला ६० लाख
आजच्या अर्थसंकल्पात पालिका शिक्षण मंडळासाठी ६० लाख रूपये मंजूर करण्यात आले. यावेळी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्याची गरज असून बालवयातच चांगले संस्कार देण्यासाठी सर्वांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
समाविष्ट योजना
झोपडपट्टीवासीयांसाठी घर, शिवाजी महाराज पुतळा उभारणी, भुयारी गटर योजना राबविणे, प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, एलईडी पथदिवा प्रकल्प, २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जॅकवेल व फिल्टर हाऊस बांधणे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे, मिळकतधारकांच्या नावे विमा योजना, न.पा. शिक्षण मंडळाकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावे विमा योजना, पालिकेच्यावतीने लवकरच इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याची घोषणा देखील यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी केली.
जमा बाजू
सर्व करांतून - ३ कोटी ८३ लाख ९१ हजार
सेवा मालमत्ता - ६५ लाख ५३ हजार १५५
महसुली अनुदाने - ६ कोटी ६१ लाख १८ हजार
किरकोळ उत्पन्न - ५३ लाख ४१ हजार ७००
विकासकामांसाठी अनुदान - ५४ कोटी ४२ लाख ४ हजार
असाधारण जमा - २ कोटी ६६ लाख ३१ हजार
आरंभी शिल्लक - १ कोटी १५ लाख १८ हजार ५६४
खर्च बाजू
आस्थापना खर्च - ६ कोटी १२ लाख
पाणीपुरवठा, वीज बिल - १ कोटी १३ लाख
शिक्षण मंडळ - ६० लाख
कर्ज हप्ते - १४ लाख
घर तेथे शौचालय योजना - १० लाख
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे - ५ लाख
भुयारी गटर योजना राबविणे - ३० कोटी
जॅकवेल फिल्टर हाऊस बांधणे - ५ कोटी
(यासह एकूण २३ घटकांवर खर्च केला जाणार आहे.)